Type Here to Get Search Results !

संत ज्ञानेश्वर माऊली सार्थ हरिपाठ अभंग १ ते ९ | विस्तारपूर्वक विवरण अर्थासहीत| ज्ञानेश्र्वर माऊलींचा हरिपाठ |

संत ज्ञानेश्वर माऊली सार्थ हरिपाठ संपूर्ण अर्थासाहित विस्तारपूर्वक माऊलींचा हरिपाठ वाचा. प्रत्येक अभंगाचा भावार्थ हा विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे. 

संत ज्ञानेश्वर माऊली सार्थ हरिपाठ अभंग १ ते ९ |  विस्तारपूर्वक विवरण अर्थासहीत| ज्ञानेश्र्वर माऊलींचा हरिपाठ |
संत ज्ञानेश्वर माऊली सार्थ हरिपाठ




संत ज्ञानेश्वर माऊली सार्थ हरिपाठ | अभंग १ ते ९

___________________________

अभंग १ देवाचीये द्वारी

____________________________

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ती चारी साधियेल्या ॥ १ ॥ 
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ||२|| 
असोनी संसारी जिव्हे वेगु करीं वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा ||३|| 
ज्ञानदेव म्हणे व्यासांचिया खुणे । द्वारकेचे राणे पांडवांघरीं ॥४॥
____________________________________
अर्थ : 
देवाच्या दारात जो क्षणभर उभा राहील, त्याला चारी मुक्ती प्राप्त होतात. मुखाने "हरी, हरी" म्हणणाऱ्या नामधारकाच्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. संसारात राहूनच जिव्हेला हरिनामाचा अधिकाधिक छंद लावावा. (नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही असे) वेद आणि शास्त्रे हात उभारून नेहमी सांगत असतात. श्रीज्ञानदेव म्हणतात, व्यासांनी स्वानुभवाने ज्या खुणा सांगितल्या, त्यानुसार साधन केल्यामुळे द्वारकेचा राणा पांडवांच्या घरचा झाला. - संत ज्ञानेश्वर माऊली सार्थ हरिपाठ
____________________________

संत ज्ञानेश्वर माऊली सार्थ हरिपाठ अभंग १ ते ९ |  विस्तारपूर्वक विवरण अर्थासहीत| ज्ञानेश्र्वर माऊलींचा हरिपाठ | देवाची ये द्वारी उभा क्षण भरी
देवाचीये द्वारी उभा 

विवरण: 
वारकऱ्यांची 'संध्या' म्हणून प्रसिद्धी पावलेल्या हरिपाठातील हा पहिला अभंग. माउलींची वाक्ये सूत्रबद्ध असतात. सूत्राची लक्षणे सांगताना 'विश्वतोमुखम्' असे एक लक्षण सांगितले आहे. त्याचा अर्थ 'ज्याचे अनेक अर्थ संभवतात, ते सूत्र' असा आहे. माउलींच्या या अभंगाचेही अनेकांनी अनेक अर्थ केलेले असून त्या त्या दृष्टिकोनातून ते बरोबरही आहेत. या ठिकाणी मुख्यतः वेदान्तकेसरी श्रीबाबाजी महाराज पंडितांच्या 'हरिपाठ रहस्य' या ग्रंथाचा आधार घेऊन त्यानुसार अभंगांचे विवेचन केले आहे.
 

माउलींनी सगुण भगवद्भक्तीचा मार्ग दाखवण्याकरता हरिपाठ रचला
आहे. येथे "हरि मुखे म्हणा" असा उपदेश करून देवाचा संबंध त्यांनी

नामाशी दाखविला आहे. नामाचा संबंध आला की रूपाचा संबंध येतोच. नामरूपयुक्त स्वरूपाला सगुण म्हणतात. अशा सगुण साकार श्रीहरीलाच येथे 'देव' म्हटले आहे. देहधारी मनुष्याला सगुणाची उपासना सुलभ असते. गीतेतही अव्यक्ताची

उपासना करणाऱ्यांना अधिक कष्ट असतात, असे सांगितले आहे (गीता

१२.५). म्हणूनच सामान्य भोळ्या भाविकांना हा सगुण-भक्तीचा मार्ग माऊलींनी हरिपाठातून दाखवून दिला आहे.

देवाच्या दारात क्षणभर उभा राहणे हे केवळ शरीराने नव्हे; तर श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने. देवळात पाऊल ठेवताच समोर भगवंत प्रत्यक्ष आहेत, हा दृढ विश्वास पाहिजे. जेथे भगवंत तोच वैकुंठलोक. साहजिकच हा भाव असलेल्याला 'सलोकता मुक्ती' मिळते. भगवंतांच्या समीप राहण्यामुळे 'समीपतेचा' लाभ होतो. देवळात मन जेव्हा तदाकार होते, तेव्हा 'सरूपता' प्राप्त होते. आणि देहभान जर हरपले, तर 'सायुज्यता' ही मिळते. अशा रीतीने चारी मुक्तींचा लाभ श्रद्धाळू भाविकाला देवाच्या दारात होतो.

एका भगवन्नामस्मरणाने अनंत जन्मीचे पातक नाहीसे होते. देवाचे नाव मुखात आले, तरी क्षणभर का असेना, मन भगवदाकार होते, या अनुभवावरून माउलींनी अखंड नामस्मरण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भगवंतांचे रूपही अखंड मनात राहील. त्यामुळे असार, नाशिवंत प्रपंचाचा विसर पडेल.

यासाठी प्रपंच व प्राप्त कर्तव्ये सोडण्याचे मुळीच कारण नाही. जिव्हेने नामस्मरणाचा वेग उत्तरोत्तर तीव्र वाढवला, म्हणजे झाले. वेदशास्त्रांनी सुद्धा नाममाहात्म्य मुक्तकंठाने वर्णिले आहे. वैदिक कर्मांची सुरुवातही नामानेच होते आणि पूर्णताही नामानेच होते.

शेवटच्या चरणांत माउलींनी यासाठी पांडवांचा दृष्टांत दिला आहे. भगवान व्यासांनी परमेश्वर प्राप्तीची नामस्मरण ही गुप्त खूणगाठ पांडवांना सांगितली आणि पांडवांनी दृढ विश्वासाने त्याप्रमाणे वागून द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णपरमात्म्याला आपल्या घरचा केले..

एकदा भगवान श्रीकृष्णांनी नारदाचा 'आपणच खरे नामधारक' हा गर्व दूर करण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी नारदाला, अर्जुनाला बोलावून आणण्यासाठी त्याच्या महालात पाठवले. नारद गेला, तेव्हा अर्जुन गाढ झोपेत होता; पण नामस्मरण अखंड चालू होते. ते पाहून नारदाचा 'नामधारकपणा'चा अभिमान नाहीसा झाला. अशी होती पांडवांची नामस्मरणभक्ती.
____________________________

अभंग २ | चहू वेदी जाण 


चहूं वेदीं जाण साही साही शास्त्री कारण । अठराहि पुराणें हरीसी गाती ॥ १ ॥ 
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २ ॥ 
एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गम न घालीं मन ॥३॥ 
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
____________________________________

भावार्थ
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांनी सांगितलेले ज्ञान श्रीहरीचेच आहे. तसेच न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा व वेदान्त या सहाही शास्त्रांनी जगाचे आदिकारण श्रीहरीच असल्याचे सिद्ध केले आहे. आणि भागवतादी अठरा पुराणे तर श्रीहरीचेच गुण गात असतात. 

दह्यात व्यापून राहिलेले लोणी जसे घुसळून वेगळे काढून घेता येते, तसे वेदशास्त्रपुराणांनी सांगितलेल्या विचारमंथनाने सर्वत्र व्यापून राहिलेल्या अनंताचा, भगवंताचा अनुभव घे. नामस्मरणाखेरीज अन्य निरर्थक गप्पागोष्टींत वेळ घालवू नकोस. तसेच प्रपंचात गुंतविणारे अन्य मार्गही सोडून दे. श्रीहरी व आत्मा एक आहेत. एकच श्रीहरी मायेचा बुरखा पांघरून शिव झालेला आहे; तर अविद्येचा बुरखा पांघरून जीव झालेला आहे. म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी नामस्मरण सोडून यज्ञयागादी किंवा हठयोगादी अवघड साधनमार्गांत तू लक्ष घालू नकोस. श्री ज्ञानदेव माउली म्हणतात, हरी-हरी म्हणणे हाच माझा नित्यपाठ आहे. तेच माझे वैकुंठ आहे. तो हरीच सर्वत्र घनदाट भरलेला मला दिसत आहे. -संत ज्ञानेश्वर माऊली सार्थ हरिपाठ

विवरण :
 भगवंतांनी वेद निर्माण करून जर आपल्या प्राप्तीचा मार्ग सांगितला नसता, तर मनुष्याला स्वतःच्या बुद्धीने ईश्वराचे ज्ञान करून घेणे शक्य नव्हते. जसे आईने सांगितल्याशिवाय मुलाला तिचे वय किंवा पूर्वचरित्र कळणे शक्य नाही, तसे ईश्वरनिर्मित सृष्टीतील देव, दानव, ऋषी इत्यादींना स्वबुद्धीने ईश्वर कळणे शक्य नाही. म्हणूनच ईश्वराने वेद, शास्त्रे, पुराणे निर्माण करवून त्यांतून कर्म, ज्ञान, उपासना, योग वगैरे ईश्वरप्राप्तीचे साधनमार्ग प्रकट केले आहेत. त्यांवर श्रद्धा ठेवून साधना केल्याने ईश्वर प्राप्त होतो, असे संतमहंतांचे दाखले आहेत.

दह्याशी एकजीव झालेले लोणी जसे घुसळून वेगळे काढावे, तसे सर्व नाश पावणाऱ्या विश्वाशी एकजीव होऊन राहिलेले अनंत, अविनाशी ईश्वरी तत्त्व शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे विचारमंथन करून शोधले पाहिजे. श्रुतिशास्त्रानुसार बुद्धीने विचार करून पाहिले असता एका श्रीहरीवाचून दुसऱ्या कोणत्याही वस्तूची सत्ता सिद्ध होत नाही. श्रीहरीशिवाय निराळे जीव-जगद्रूप विश्व आहे, असे जे वाटते, ते खोटे ठरून एका श्रीहरीचीच सत्ता आपली बुद्धी निश्चयपूर्वक मान्य करते. पण यासाठी साधकाने श्रीहरीच्या नामस्मरणाखेरीज अन्य प्रापंचिक नाशवंत गोष्टीत आपली बुद्धी गुंतवता कामा नये.

बुद्धीचा निश्चय असा पाहिजे की, एकच परमात्मा सृष्टिनिर्माता ईश्वर आहे. तोच ‘भक्तांचिया काजासाठी, साधूंचिया प्रेमासाठी लाज सोडून' राम कृष्णादी अवतार घेऊन आपल्यासारखी शरीरे आणि आपल्यासारख्याच भाव-भावना घेऊन आपल्यांत राहून लीला करीत आहे. तोच प्राण्यांच्या शरीरात जीवरूपाने राहून त्यांच्याकडून विश्वातील कामे करवून घेत आहे. हा सर्व एकच आहे. समजा एक गृहस्थ आहे. स्वतःच्या कल्पनेने तो नाटक रचतो. त्याचे दिग्दर्शन करतो. त्याच नाटकात प्रसंगानुसार नायक होतो, कदाचित् स्त्रीभूमिकाही करतो. हे नाटक पाहून बाहेर आल्यानंतर मित्रांबरोबर होणाऱ्या चर्चेत आपण म्हणतो, "नायकाचं काम छान झालंय्. त्या नटीची भूमिका पण चांगली झाली. मुळात नाटक चांगलं आहे. खरं कौशल्य दिग्दर्शनात आहे, इ." तितक्यात आपला एक मित्र सांगतो की, "ज्या गृहस्थांनी हे नाटक लिहिलंय्, दिग्दर्शनही त्यांचंच, नायकाची आणि नटीची भूमिकाही त्यांचीच." ही गोष्ट ऐकल्यानंतर नाटककार, दिग्दर्शक, नाटकातली पात्रं हे जे पहिल्यांदा आपल्याला वेगवेगळे वाटत होते, ती एकच व्यक्ती आहे, याची खात्री पटते. तसेच वेदशास्त्रे, संत- सज्जन हे जे आपले सुहृद आहेत, यांच्या वचनावर विश्वास ठेवून बुद्धीने विचार केला की, एकच परमात्मा या सर्व रूपांनी नटलेला आहे, हे लक्षात येते. आणि सतत नामस्मरणाने शुद्ध झालेल्या चित्ताला याची खात्री पटते. म्हणून माउली म्हणतात, चित्तशुद्धीसाठी यज्ञयाग, हठयोग, पंचाग्निसाधन तप, यांसारख्या अवघड साधनांची काहीही जरूर नाही.

यासाठी त्यांनी स्वानुभव सांगितला की, 'हरी, हरी, हरी' हा नित्यपाठ मी केला. त्यामुळे सगुण-साकार हरी हाच वैकुंठ परमात्मा आहे, याचा मला अनुभव आला. किंबहुना अणुरेणूत श्रीहरीच भरून राहिला आहे, हे मला प्रत्यक्ष दिसू लागले.

तात्पर्य, वेदशास्त्रांच्या आणि संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून सगुण श्रीहरीचे अखंड नामस्मरण करावे. त्याचबरोबर तोच भगवंत 'स्थिरचर व्यापुनि अवघा दशांगुळे उरला' याचे भान ठेवावे. त्याच्याशिवाय प्रपंच नावाची दुसरी वस्तूच नाही, असा निश्चय करावा. भगवंताच्या प्राप्तीचा इतका सोपा मार्ग असताना यज्ञयाग, तीर्थयात्रा, योग इ. कठीण मार्गाने जाच कशाला? शेवटी माउलींनी एका हरिपाठानेच वैकुंठ परमात्मा भेटल्याचा व तोच चराचरात व्यापून राहिल्याचा आपला स्वत:चा अनुभव सांगितला आहे.
____________________________

अभंग 3 त्रिगुण असार निर्गुण हे सार 


त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥ 
सगुण निर्गुण गुणाचे अवगुण । हरिविणें मन व्यर्थ जाय ॥ २ ॥ 
अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथोनि चराचर त्यासी भजे ॥३॥ 
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥
____________________________________

भावार्थ :- 
भगवंतांचे त्रिगुणात्मक सगुण रूप उपाधियुक्त आहे; तर : निर्गुण हे उपाधिरहित आहे. हा सारासार विचार हरिपाठाने कळतो. सगुण असो की निर्गुण, दोन्हींमध्ये गुणाचा संबंध आहेच. म्हणून एका श्रीहरीला सोडून सगुण-निर्गुणाच्या वादात व्यर्थ मन गुंतवू नकोस. जो इंद्रियांना कळत नाही, ज्याला आकार नाही, पण जेथून चराचराची उत्पत्ती झाली, त्याचेच भजन कर. श्रीज्ञानेश्वरमाउली म्हणतात, माझ्या मनात अखंड 'रामकृष्ण' मंत्राचा जप असून ध्यानात त्याचेच रूप आहे. अनंत जन्मांच्या पुण्याईनेच अशी स्थिती होते. -संत ज्ञानेश्वर माऊली सार्थ हरिपाठ

विवरण
भगवंतांचे निर्गुण रूप हे 'सार' म्हणजे घेण्याजोगे आहे आणि त्रिगुणात्मक रूप हे 'असार' म्हणजे त्याज्य आहे, असा काहीनी वरवर बरोबर वाटणारा अर्थ लावला आहे. परंतु माउलींना तो अभिप्रेत असेल, असे वाटत नाही. कारण या हरिपाठात नामाचे महत्त्व सांगितले आहे. आणि नाम हे गुणात्मक आहे. मग ते 'त्याज्य' आहे, असे माउली कसे म्हणतील बरे म्हणून त्रिगुणात्मक रूप मायागुणांच्या उपाधीने युक्त असून निर्गुण रूप हे मायागुणांच्या उपाधीने रहित आहे. वास्तविक पाहता निर्गुण हेही 'मायागुणरहित' या निषेधउपाधीने युक्त आहेच. हा सर्व सार- असार - विचार हरिपाठाने म्हणजेच हरिनामस्मरणाने समजतो. कारण नामस्मरणाने अन्तःकरणातील अविद्या नाहीशी होते आणि अविद्येच्या अभावी सगुण-निर्गुण भेद नाहीसा होऊन एकरूप अविद्या- विद्योपाधिरहित असे निरुपाधिक भगवत्स्वरूपच अनुभवाला येते.
 

सगुण असो की निर्गुण दोन्हींमध्ये गुणाचा संबंध आहेच. म्हणून अशा वादात मन व्यर्थ गुंतवण्याचे कारण नाही. सगुणाच्या प्रेमभक्तीत मन तल्लीन झाले, तर भक्ताची जाणीवच हरपते. आणि जाणीवच नसेल तर गुणाच्या उपाधी कळतच नाहीत. म्हणून श्रीहरीचा आश्रय न करता 'निर्गुण श्रेष्ठ, सगुण कनिष्ठ' या सारखा वाद करण्यात काय फायदा ? त्यापेक्षा माउलींनीच एका अभंगात म्हटल्याप्रमाणे "तुज सगुण म्हणो की निर्गुण रे । सगुण- निर्गुण एक गोविंदु रे ।" हा भाव ठेवला आणि सर्वत्र तो श्रीहरीच पाहिला तर मन निर्विकल्प होऊन भगवत्प्राप्तीचा आनंद मिळू शकतो. सगुण- निर्गुणाच्या व्यर्थ चर्चेतून काहीच निष्पन्न होत नाही.

भगवंत अव्यक्त आहेत. म्हणजे इंद्रियांना ते कळत नाहीत. तसेच ते निराकार आहेत. म्हणजे विशिष्ट देश, विशिष्ट काळ व विशिष्ट वस्तुत्व यांची त्यांना मर्यादा नाही. जरी त्यांनी राम, कृष्ण इत्यादी मानवासारखी किंवा मत्स्य, कूर्म इ. इतर प्राण्यांसारखी रूपे धारण केलेली असली, तरी ती मानवासारखी प्रकृतीच्या गुणांनी उत्पन्न झालेली नव्हेत. स्वतःच्या इच्छेनुसार ते विविध रूपे धारण करतात. भगवान श्रीकृष्णांनी जन्मत:च आपल्या मातापित्यांना दिव्य विष्णुरूप दाखविले. त्यांच्या विनंतीनुसार त्यांनी क्षणात पुन्हा बालरूप धारण केले. बालपणी, तर निरनिराळ्या राक्षसांचा वध करताना निरनिराळी रूपे धारण केली असली पाहिजेत. एकदा यशोदा मातेला मुखातच त्यांनी विश्वरूपाचे दर्शन घडविले. 

अर्जुनाचे सारथी होते ते सामान्य मानवी रूपात; पण तेथल्या तेथे त्यांनी अर्जुनाला विश्वरूप दाखविले आणि "तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते" अशी प्रार्थना करताच "सुदुर्दर्शम् इदं रूपं” असे चतुर्भुज रूप दाखविले. हे सर्व करताना त्यांनी आपला मानवी आकारही तसाच ठेवला. मायेच्या आश्रयाने अनंत कोटी ब्रह्मांडांची घडामोड करणाऱ्या भगवंतांना अव्यक्त निराकार राहून भक्तांचिया काजासाठी सगुण साकार देहाचा आश्रय करणे काय कठीण आहे? म्हणून त्यांची सगुण साकार तनूही निर्गुण निराकार परब्रह्माइतकीच श्रेष्ठ आहे. पूजनीय आहे. वंदनीय आहे. 
“अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्” (अज्ञानी लोक माझा मानवी पांचभौतिक देहासारखा आकार पाहून मला मनुष्य समजून माझी अवहेलना करतात.) असे स्वतः भगवंतांनीच गीतेत सांगितले आहे. पण सगुण साकार श्रीहरींचा देह पांचभौतिक नसतो; तर तो सच्चिदानंद परमात्मरूपच असतो.

म्हणून ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात की, मी ध्यानात त्या सगुण साकार रामकृष्णांचे रूप पाहातो आणि मनात 'रामकृष्ण हरी' चा जप करतो. ध्यानात रूप आणि मनात नाम हीच खरी भक्ती. हा श्रीहरीच्या नामरूपाचा ध्यास साधकाला अनंत जन्मांच्या पुण्याईनेच लाभत असतो. प्रथम प्रयत्नाने आणि अभ्यासाने घेतलेला हा ध्यास पुढे त्याचा स्वभावच बनून जातो. जसे प्रपंचाचे चिंतन करण्यासाठी आपल्याला कोणतेही कष्ट पडत नाहीत. कारण अनंत जन्म आपण तेच करीत आहोत, तशीच आतापासून भगवंतांच्या नामजपाची सवय लावली, तर कालांतराने तोच आपला स्वभाव बनून जातो. या नामरूपाच्या चिंतनाम्नीने अंत:करणातील वासना जळून जातात आणि अंत:करण शुद्ध होते. अशा शुद्ध अंत:करणात “यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति । तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति” ("जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यात पाहतो. त्याला मी कधीच नाहीसा होत नाही व तो मला नाहीसा होत नाही.") असा भगवत्स्वरूपाचा साक्षात अनुभव येऊ लागतो.
____________________________

अभंग ४ | भावेंविण भक्ति भक्तिविणें मुक्ति


भावेंविण भक्ति भक्तिविणें मुक्ति बळेंविण शक्ति बोलूं नये ॥ १ ॥ 
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित उगा राहे निवांत शिणसी वायां ॥ २॥ 
सायास करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्यागुणें ॥३॥ 
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचे ॥४॥
____________________________________
भावार्थ
भाव नसताना भक्ती आहे असे म्हणणे व्यर्थ आहे आणि भक्तीशिवाय मुक्ती मिळणे कठीण आहे. अंगात बळ नसताना शक्ती आहे, असे म्हणण्यासारखेच ते आहे. देवता लागलीच प्रसन्न कशा होतील म्हणून उगीच का कष्टी होतोस ? शांतपणे स्वस्थ राहा ना! रात्रंदिवस मोठे कष्ट सहन करून प्रपंच करतोस. त्याऐवजी हरीला का नाही भजत ? श्रीज्ञानदेव म्हणतात, एरव्ही नाही. हरिजप करशील, तरच प्रपंचाचे बंधन तुटणार आहे, - संत ज्ञानेश्वर माऊली सार्थ हरिपाठ

विवरण: 
सर्वत्र एक श्रीहरीच व्याप्त असून त्याच्यावाचून दुसरी वस्तूच नाही, असा दृढ विश्वास असणे म्हणजे भाव. आणि अशा श्रीहरीवर आत्मवत निःसीम प्रेम असणे यालाच भक्ती म्हणतात. “सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा" या नारदीय भक्तिसूत्रात सगुण श्रीहरीवर परम प्रेम असण्यालाच भक्ती म्हटले आहे. प्रत्येकाला आपला देह, आपले कुटुंब, आपले घर, धन इत्यादींविषयी परम प्रेम असते. परंतु असे प्रेम भगवंतांविषयी असत नाही. वास्तविक भगवंतच या सर्व रूपांनी नटलेले आहेत, हा दृढ भाव असेल, तर आपल्याला बाह्य वस्तूंविषयी वाटणारे प्रेमच भक्ती होईल. 

पण वासनांमुळे अशुद्ध असलेल्या अंतःकरणात शास्त्रांनी व संतांनी सांगूनही हा विश्वास उत्पन्न होत नाही. म्हणून हरिनामस्मरणाने अंतःकरण शुद्ध केले पाहिजे. शुद्ध अंतःकरणातच हा भाव दृढ होतो. "जैसा भाव जयापासी । तैसा देव तयासी” असे समर्थ म्हणतात. तर "तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव । भावापाशी देव शीघ्र उभा". असे तुकाराम महाराज म्हणतात. जोवर भक्ती नाही, तोवर मुक्ती होऊच शकत नाही, असे माउली म्हणतात. मुक्तीची दोन अंगे आहेत. 

एक दुःखनिवृत्ती आणि दुसरे परमानंदाची प्राप्ती. आत्मज्ञानाने संसार ही स्वतंत्र वस्तू नाही, हे कळल्यावर दुःखनिवृत्ती होते; पण भगवद्भक्तीशिवाय परमानंदाची प्राप्ती होत नाही. या परमानंदासाठीच तर आत्मज्ञान झाल्यानंतरही थोर थोर आचार्य आणि संत भगवद्भक्तीत रमतात. अंगात बळ नसताना मी हे करीन आणि ते करीन हे म्हणणे जसे व्यर्थ आहे, तसेच श्रीहरीच्या अद्वैतसत्तेवर विश्वास नसताना श्रीहरीवर भक्ती आहे, असे म्हणणे व्यर्थ आहे आणि भक्तीशिवाय मुक्ती अशक्य आहे.

जगातील सुखांच्या मागे लागलेला मनुष्य ती सुखे मिळवून देणाऱ्या देवतांच्या आराधना करताना दिसतो. पण या देवता प्रारब्धानुसार ठरलेल्या सुखदुःखप्राप्तीत काहीही फरक करू शकत नाहीत. श्रीएकनाथमहाराज म्हणतात- 'अदृष्टाआधीन हे शरीर । तेथ आलियाही हरिहर अन्यथा न करवे अणुमात्र । हे वेदशास्त्रसंमत ॥” आपल्या पूर्वकर्मानुसार बनलेल्या प्रारब्धभोगाचा संकल्पकर्ता श्रीहरीच आहे. म्हणून त्याचा संकल्प अन्यथा करण्याचे सामर्थ्य इतर देवतांत नाही. कारण सर्वांचा स्वामी तोच आहे. “लभते च ततः कामान् मयैव विहितान् हि तान्” (गीता - ७.२२). श्रीभगवंत म्हणतात- “अन्य देवतांच्या आराधनेने मिळणारे सुखभोगही माझ्या संकल्पानुसारच त्याला मिळत असतात”. हे झाले सांसारिक सुखांच्या बाबतीत. परमानंदरूप मोक्ष तर कोणतीच देवता देऊ शकत नाही. 

कारण एक परमात्मा सोडून बाकी सर्व जीवच असल्यामुळे त्यांनाच परमानंद प्राप्त नाही, तर त्या इतरांना त्याचा लाभ कोठून देणार? म्हणून अन्य देवतांना प्रसन्न करण्याचा खटाटोप हा व्यर्थ शीण आहे. त्याऐवजी निवांत राहून श्रीहरिनामस्मरण करणेच योग्य. परमानंदाचा प्रदाता तोच आहे.

मनुष्य प्रपंच सुखाचा करण्यासाठी रात्रंदिवस किती काबाडकष्ट करतो बरे ! पण त्यामुळे त्याला सुख मिळाल्याचे दिसते का ? संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे "सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे" च त्याच्या वाट्याला येत असते. 

ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात माउली म्हणतात- “चोहोबाजूंनी वणवा पेटला असता तेथून दूर निघून जाऊ नये काय? तसेच या दुःखमय संसारात आल्यावर हरीचे भजन करू नये काय? हरिभजन न करता या दुःखातून पार होण्यासाठी त्याच्या अंगी असे कोणते बळ आहे बरे ! विद्येचे की वयाचे? येथील सर्व भोगाचे विषय हे एका देहाच्या सुखाकरिता आहेत. आणि तो देह तर काळाच्या तोंडातच पडला आहे.” मनुष्याचे प्रयत्न सुखाकरता असतात; पण कामनेमुळे तो धर्माधर्माचा विचार नाही. 

शिवाय विषयासक्त बुद्धीमुळे धर्माधर्माचा विचार त्याला करता येत नाही. अशा स्थितीत केलेले कर्म दैवगत्या पाप-पुण्यापैकी ज्या सदरात पडेल, त्यानुसार त्याला सुख-दुःखरूप फळ भोगावे लागते. अशा या बेभरवशाच्या संसारात आपल्या प्रयत्नाने कसे व किती सुख मिळवता येईल ? हे जाणूनच श्रीभगवंतांनी, दुःखाला कारणीभूत होणाऱ्या पापकर्माचा नाश करून सुखाची प्राप्ती करून देईल, अशा नामस्मरणादी भक्तिमार्गाचा जीवाला सोपा उपाय सांगितला आहे.

संसार सत्य आहे, असे समजणे, हेच संसाराचे धरणे होय. हे संसाराचे धरणे कोणत्याही साधनाने तुटत नाही. उलट इतर साधने त्या धरण्याला साहाय्यक होतात. ज्ञानाने हे धरणे खोटे आहे, हे समजले, तरी ते निःशेष सुटत नाही. त्याला उपाय म्हणजे अखंड नामस्मरण करणे हाच. जीवाला स्वसामर्थ्याने तोडण्याला अशक्य असे संसारबंधन, संसारातल्यासारखे कष्ट न करता केवळ वाचेने उच्चारण्याला सुलभ अशा नामस्मरणाने निःशेष तुटते. नृसिंहपुराणातही म्हटले आहे की,

“सर्वदुःखनिवारणम् । समस्तपुण्यफलदं कलौ विष्णोः प्रकीर्तनम् ॥”

 
____________________________

अभंग ५ | योग याग वीधी येणे नोहे सिद्धी 


योगयागविधी येणे नोहे सिद्धि । वायांचि उपाधि दंभधर्म ॥ १ ॥ भावेंविण देव न तुटे संदेह । गुरूविणें अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेंविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे || ३ || ज्ञानदेव सांगे दृष्टान्ताची मात । साधूचे सांगात तरणोपाय ||४||
____________________________________
भावार्थ : 

योग, याग, विधी यांच्या योगाने सिद्धी प्राप्त होत नाही. हे सर्व धर्म दंभरूप असून व्यर्थ उपाधी आहेत. श्रद्धेशिवाय देव भेटत नाही आणि संशय दूर होत नाही. सद्गुरूंवाचून अनुभव कसा येईल ? तपावाचून दैवते भेटत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही. तसेच गुह्यज्ञानाशिवाय हित होऊ शकत नाही. श्रीज्ञानदेवमाउली म्हणतात, दृष्टान्ताची गोष्ट अशी आहे की, संतांच्या संगतीतच संसारसागर तरून जाण्याचा उपाय आहे.. - संत ज्ञानेश्वर माऊली सार्थ हरिपाठ

विवरण: 
यमनियमादी अष्टांग योग हा अत्यंत कठीण मार्ग आहे. माउली त्याला 'नित्य नवा अग्निप्रवेशच' म्हणतात. लक्षावधी माणसात एखादाच कदाचित त्या मार्गाने आत्मज्ञान प्राप्त करू शकेल. महिपतिबाबा भक्तलीलामृतात म्हणतात,

“योगमार्ग बहुत कठिण । विरळा साधी लक्षांतुन ।
भोळ्याभाळ्या सकळां कारण । नामचि पावन करितसे ॥" म्हणून सर्वसामान्यांसाठी नामजपाचा मार्गच राजमार्ग आहे. 
अग्निहोत्रादिक नित्य करावयाचा यज्ञ किंवा वेदांत सांगितलेले यज्ञ है "यथासांग सध्याच्या काळात यथासांग करता येणे अशक्य असल्याने त्यांच्यापासूनही फलप्राप्ती होणे कठीण आहे. समर्थ श्रीरामदासस्वामी म्हणतात, ते कर्म काही घडेना। घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना ।।" अशी सध्याची अवस्था आहे. 

विधी म्हणजे संध्यावंदनादी धार्मिक नित्यकर्मे. फलाची आशा सोडून ही केली तर केवळ चित्ताची शुद्धी होते. पण सिद्धी प्राप्त होत नाही. सिद्धी म्हणजे सर्व दुःखांची संपूर्णपणे निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. यालाच मोक्ष किंवा मुक्ती म्हणतात. योग याग विधी ही कर्मे आहेत. यांच्यापासूनही काही फलप्राप्ती आहे. पण मुक्ती नाही. उपनिषदातही "न कर्मणा... अमृतत्वमानशुः" (कर्माने अमृतत्वाची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होत नाही.) असे सांगितले आहे. म्हणून माउली म्हणतात, हे सर्व धर्म “आपण धार्मिक आहोत" असा दंभ मिरविण्यापुरतेच उपयोगी आहेत. म्हणून हा खटाटोप व्यर्थ आहे.

भाव म्हणजे श्रद्धा. भगवंतच "स्थिरचर व्यापुनि अवघा दशांगुळे उरला" अशी पूर्ण श्रद्धा असल्यावाचून भगवंतांची भेट होत नाही. कारण अज्ञानाने आपल्याला दृश्य जग भगवंताहून वेगळे आणि खरे वाटते. sampurna haripath

बारीकशा एका बीमधून वटवृक्ष तयार होतो. त्याचे खोड वेगळे, फांद्या वेगळ्या, पाने वेगळी, पारंब्या वेगळ्या, मुळे वेगळी; असे सर्व वेगवेगळे प्रत्यक्ष अनुभवाला येते. पण सूक्ष्म विचारांती लक्षात येते की, "आधी बीज एकले। बीज अंकुरले रोप वाढले ।।" एका बारीकशा बीचाच हा सर्व विस्तार आहे. तसेच हा सर्व अनंत कोटी ब्रह्मांडाचा विस्तार एका ईश्वरी शक्तीचा विस्तार आहे. असे सर्व शास्त्रे आणि संतमहंत कंठरवाने सांगतात. त्यावर भाव, श्रद्धा ठेवली की, देव आपल्यातच आपल्याला भेटतो. 

या श्रद्धेनेच सर्व संशय दूर होतात. हे संशय दूर होण्यासाठी सद्गुरूंना शरण जावे लागते. ते गुरू स्वतः अनुभवी असावे लागतात. गीतेत हे ज्ञान मिळविण्याचा उपाय सांगितला आहे.

"तद्विद्धि उपदेक्ष्यन्ति प्रणिपातेन परिप्रश्नेनते ज्ञानं सेवया । ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥'

(शास्त्र जाणणाऱ्या आणि आत्मतत्त्वाचा साक्षात्कार झालेल्या सद्गुरूंना तू शरण जा. त्यांची सेवा कर. त्यांना तुझ्या शंका विचार, म्हणजे ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील. त्यांच्याकडून आत्मतत्त्व, ईश्वरस्वरूप जाणून घे.) सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानावर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेले साधन

केले असता माणसाला अनुभव येतो. त्याचे सर्व संशय फिटतात. तपश्चर्या केल्याशिवाय देव भेटत नाहीत. तसेच दिल्याशिवाय आपल्याला काहीही परत मिळत नाही. जे सर्वस्व देतात, तेच या जगात चिरंजीव होऊन राहतात, हे आपण पाहातोच. “या हाताने द्यावे आणि त्या हाताने घ्यावे," ही म्हणच आहे. भगवंताला आपण तन, मन, धन, दिले तरच भगवंत स्वत:ला आपल्या स्वाधीन करतात. haripath lyrics sampurna haripath

तसेच 'गुजेविण' म्हणजे संतसंगतीत एकान्तात होणाऱ्या अत्यंत जिह्वाळ्याच्या गुह्य गोष्टीवाचून हित म्हणजे अत्यंत कल्याणकर असा हा अद्वैतसत्तेचा अनुभव कोणी सांगत नाही. साधुलोक आपला परमात्मविषयक अनुभव अमोल असल्यामुळे गुप्त ठेवतात. 

जसे कंजूष माणूस स्वत:ला प्रिय असलेले धन अत्यंत गुप्त ठेवतो आणि आपल्याला अत्यंत प्रिय असणाऱ्याला व दक्षतेने ते सांभाळणाऱ्यालाच देतो, तसे संतलोक आपला 'गुज' - गुह्य अनुभव हरिप्राप्तीचा जिव्हाळा असणाऱ्यालाच देतात. भगवंतांनीसुद्धा अर्जुनाला म्हटले,

"सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः । इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ।।

(सर्वांत गुह्य असणारा हा माझा सर्वांत श्रेष्ठ उपदेश ऐक. तू मला अत्यंत प्रिय आहेस. म्हणून तुझ्या हिताचा हा उपदेश मी तुला सांगतो.) माउली म्हणतात, दृष्टान्तांनी ही गोष्ट पूर्णपणे समजावून देता येणारी नाही. याला उपाय एकच आहे. तो म्हणजे साधूंचा संग. साधूंच्या संगतीनेच ही गुह्य गोष्ट जाणून घेऊन, त्याप्रमाणे साधना करून हा अनुभव घेतला पाहिजे. तरच संसारसागरातून तरून जाता येईल.
____________________________

अभंग ६ | साधुबोध झाला तो निरोनिया ठेला


साधुबोध झाला नुरोनिया ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥ १ ॥ 
कापुराची वाती उजळली ज्योती। ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥ 
मोक्षरेखे आला भाग्य विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त ||३|| 
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्त्वीं ॥४॥
____________________________________
भावार्थ : 
साधूकडून आत्मज्ञान झाले असता मुमुक्षू देहाभिमानरहित होतो आणि आत्मानुभवाने आत्म्याशी एकरूप होतो. त्याची जीवदशा पूर्णपणे मावळते. जसा कापराला अग्नी लागताच ज्योत उत्पन्न होते, पण कापूर जळून जाताच कापूरही उरत नाही आणि ज्योतही उरत नाही. हरिभक्त जेव्हा साधूचा मुद्रांकित होतो, तेव्हा मोक्ष त्याच्या पायाशी येतो आणि हरिभक्तीच्या परम भाग्याने तो संपन्न होतो. श्रीज्ञानदेव म्हणतात, म्हणूनच मला संतांच्या संगतीतच गोडी वाटते. कारण त्यामुळेच मला श्रीहरी जनांत, वनांत आणि आत्मतत्त्वात असल्याचा अनुभव आला. - संत ज्ञानेश्वर माऊली सार्थ हरिपाठ

विवरण : 
ज्यांना शब्दबोधाने आपण आत्मस्वरूप आहोत, असे कळले आणि ज्यांनी साधनेने त्याचा साक्षात अनुभव घेतला तो साधू. श्रीएकनाथांनी त्यांचे वर्णन असे केले आहे - "जे सर्वांगी चैतन्यघन जयां सगुण निर्गुण समसमान । जे निजजीवन सद्भावा ।” (चतुःश्लोकी भागवत-७). किंवा भगवद्गीतेत “उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: । (४.३४). या ठिकाणी ज्यांना ज्ञानी म्हणजे शास्त्र जाणणारे आणि तत्त्वदर्शी म्हणजे आत्मसाक्षात्कारी म्हटले आहे, ते साधू.  sampurna haripathharipath lyrics

अशा साधूंना शरण गेल्याने ते जो आत्मतत्त्वाचा बोध करतात, त्यांच्या संगतीत त्यांच्या ठिकाणी असलेल्या भक्तिप्रेमाचा जो आस्वाद मिळतो, त्यामुळे मुमुक्षूचा देहाभिमान गळून पडतो. वेदान्तशास्त्राप्रमाणे एका परब्रह्मावाचून दुसरी वस्तूच नाही. पण आपण मात्र स्थूल, सूक्ष्म व कारण- शरीरे म्हणजे 'मी' असे समजतो. ही सर्व काल्पनिक किंवा भासणारी आहेत. जसा अंधुक प्रकाशात दोरीवर साप भासतो, तसे अज्ञानामुळे हे सर्व विश्व त्या परब्रह्माच्या आधारावर भासते. दिवा आणल्याबरोबर तो साप 'नुरोनिया ठेला' होतो, म्हणजेच साप कुठेही न जातासुद्धा तिथल्यातिथेच नाहीसा होतो. तसेच साधुबोधाने आपले खरे स्वरूप कळल्याबरोबर विश्वाचे भान तत्काळ लोप पावते. यालाच म्हणायचे 'नुरोनिया ठेला'. पुढे साधनेने त्याला आत्म्याचा साक्षात अनुभव येतो. यालाच 'ठायींच मुराला' असे म्हटले आहे.

यासाठी माउलींनी कापराचा सुंदर दृष्टान्त दिला आहे. कापूर पेटवल्यानंतर ज्योत उत्पन्न होते. पण कापूर संपताच ज्योतही संपते. कशाचाही मागमूस उरत नाही. कापरासारखाच स्वच्छ अंतःकरणाचा हा मुमुक्षू. सद्गुरू त्याला ज्ञानाच्या अग्नीने पेटवतात. तेव्हा त्याच्या ठिकाणी 'अहं ब्रह्मास्मि' या ज्ञानाची ज्योत पेटू लागते. त्यामुळे त्याचा जीवभाव जळून जातो व मी ब्रह्मस्वरूप आहे, एवढीच जाणीव त्याला उरते, हेच 'ठायीच मुराला' होणे होय.
बाबा महाराज सातारकर हरिपाठ

'मी ब्रह्म आहे' या जाणिवेत 'मी' उरतोच. वेगळेपण उरते. ही जाणीव उरणे, हेही 'ज्ञानबंधन' आहे, असे माउली म्हणतात. हे ज्ञानबंधन श्रीहरीच्या भक्तीवाचून तुटत नाही. ज्ञानाच्या अग्नीत हे ज्ञानबंधन तोडण्याचे सामर्थ्य नाही. कारण ते ज्ञानानेच उत्पन्न झालेले आहे. हे 'ज्ञानबंधन' म्हणजेच मूळ माया होय. निर्विकल्प स्वरूपाच्या ठिकाणी 'अहं ब्रह्मास्मि' हे जे स्फुरण होते, हेच मूळ मायेचे लक्षण असे नाथादिक संत म्हणतात. या मीपणाच्या जाणिवेनेच द्वैतभ्रम होतो. जे काही 'द्रष्टा दृश्य' स्वरूपाने स्फुरते, तो श्रीहरीच स्फुरतो, असे अनुभवाने कळून आल्यावर मीपण ठायीच्या ठायीच मुरते. पण पुन्हा मीपण स्फुरून आपल्या अस्तित्वाच्या जाणिवेने द्वैतभ्रम होऊ नये, म्हणून साधुपुरुष, स्वतः आत्मस्वरूप असून भक्ताच्या प्रेमाला विषय होण्याकरिता साकार झालेल्या सगुण श्रीहरीची प्रेमभक्ती करून 'मी ब्रह्म' ही जाणीव ठेवणाऱ्या मनाला निःशेष मुरवितात. श्रीहरिरूप प्रेमसागरात बुडालेले मन पुन्हा जागे होत नाही. मन नाहीसे झाल्यावर मी देह किंवा मी ब्रह्म या दोन्ही अज्ञान ज्ञानाच्या कल्पना नाहीशा होऊन निर्विकल्प श्रीहरीशी जीव समरस होतो. याला भक्तिदृष्टीने 'ठायींच मुराला ' असे म्हणतात. हीच परमसिद्धी होय. श्रीनाथमहाराज म्हणतात, “निर्विकल्प स्वरूपप्राप्ती । अवश्य पावणे आहे चित्ती । तैं करावी भगवद्भक्ती ।
उत्कट प्रीति अविश्रम ।।" ही निर्विकल्प स्थिती अखंड नामस्मरणादी भक्तीने प्राप्त होते.

मोक्षाची दोन अंगे आहेत. दुःखनिवृत्ती व परमानंदप्राप्ती. त्यांपैकी दुःखनिवृत्ती जीव-ब्रह्माच्या ऐक्यस्वरूप ब्रह्मज्ञानाने होते; पण परमानंदाची प्राप्ती केवळ भक्तीनेच होते. अर्थात हरिभक्ताला केवळ प्रेमभक्तीने या दोन्ही अंगांची प्राप्ती होते.

जीवब्रह्मैक्यविचाराने आत्म्यावाचून दुसरा पदार्थच नसल्यामुळे द्वैताच्या अभावी दुःख होण्याचे कारणच नाही. हे वास्तविक खरे असले तरी प्रारब्धभोगकाळी शरीराला दुःखाचे चटके सहन करावे लागतात. कारण ज्ञानाने सर्व जग खोटे वाटून दुःखही खोटे असल्यामुळे ते भासू नये, इतके दृढ अपरोक्ष ज्ञान भक्तीवाचून होत नाही, असे नाथ आदि संत म्हणतात.  हरिपाठ मराठी डाउनलोड pdf

त्याची उदाहरणेही आपल्याला भक्तचरित्रात आढळतात. संत तुकाराम, संत मीराबाई, संत गोरा कुंभार, संत रामकृष्ण परमहंस इत्यादींच्या जीवनातील दुःखे पाहिल्यानंतर याची प्रचीती येते. भक्तीच्या योगाने श्रीहरिस्वरूप झालेले अंत:करण, दुःख जाणत नाही. मोक्ष हरिभक्ताच्या रेखे म्हणजे पायातळी येतो. “मुक्ति लागती चरणी ब्रह्मज्ञान लोटांगणी । " हरिभक्ताला ब्रह्मज्ञान लोटांगण घालते, म्हणून मुक्तीही त्याचे पाय सोडत नाही.

ज्या हरिभक्तीने एवढा थोर अधिकार प्राप्त होतो, हे साधनही अतिशय सोपे आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण यांसारख्या कोणालाही सहज करता येणाऱ्या या गोष्टी आहेत. हे साधन सुलभ असून सर्वजण ते का करीत नाहीत, असे उद्धवाने भगवंतांना विचारले, तेव्हा भगवंत म्हणाले, “देवो म्हणे भाग्येविण माझी भक्ती । न घडे निश्चिती उद्धवा ॥ " ठिकाणी भक्तिप्रेम उत्पन्न होण्यासाठी मोठे भाग्य पाहिजे. भगवद्भक्तीसारखे माझ्या दुसरे भाग्य नाही. “याहीवरी पार्था । माझे भजनी आस्था । तयातें मी माथां । मुकुट ।।" (ज्ञानेश्वरी). या ओवीत ज्ञान्यापेक्षा हरिभक्ताच्या भाग्याचा मोठा गौरव केला आहे. हरिभक्त हा अत्यंत निरभिमान व विनीत असतो. अशा हरिभक्तालाच साधूचा मुद्रांकित म्हणतात.

माउली म्हणतात, जीवाला हा सर्व लाभ होतो, तो संतसंगतीने. म्हणून मला सज्जनसंगतीतच गोडी वाटते. याचे फळ मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. संतसंगतीमुळे जनी म्हणजे जंगमसृष्टीत, वनी म्हणजे स्थावर सृष्टीत आणि आत्मतत्त्वी म्हणजे माझ्या आत्म्याच्या ठायी मला श्रीहरीवाचून दुसरे काही दिसतच नाही.
____________________________________

अभंग ७ |  पर्वताप्रमाणें पातक करणें


पर्वताप्रमाणें पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तांसी ॥१॥ 
नाहीं ज्यासी भक्ती ते पतित अभक्त । हरीसी न भजत दैवहत ॥२॥ 
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैंचा दयाळ न पवे हरी ||३|| 
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वाघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥
____________________________________

भावार्थ : 
अभक्त पर्वतासारखी प्रचंड पापे करतो. त्याची ती पापे वज्रलेपासारखी त्याला कायम चिकटून राहतात. ज्यांना हरीविषयी प्रेम नाही, ते पापी होत, ते अभक्त होत. ते दुर्दैवी असल्यानेच हरीला भजत नाहीत. वेदान्त तत्त्वज्ञानाची अनंत रूपांनी व अनंत काळ बडबड केली तरी भक्तीवाचून हरी दयाळू असला, तरी पावत नाही. ज्ञानदेवमहाराज म्हणतात, आत्मा हा स्वयंप्रमाण असून तोच माझे सर्वस्व आहे. तोच एकटा सर्वांच्या ठिकाणी पूर्णत्वाने नांदत आहे. - संत ज्ञानेश्वर माऊली सार्थ हरिपाठ अभंग १ ते ९ |  विस्तारपूर्वक विवरण अर्थासहीत| ज्ञानेश्र्वर माऊलींचा हरिपाठ |

विवरण : 
जीव हा मुळात परब्रह्मस्वरूप असूनही तो स्वत:ला परब्रह्माहून निराळा मानतो. हा पांचभौतिक देह म्हणजे 'मी' अशी त्याची ठाम समजूत आहे. या समजुतीमुळेच देहाने केलेल्या पाप-पुण्यांचा तो भोक्ता झाला आहे. "बळे देह मी म्हणता कोटी ब्रह्महत्या माथां ॥" अनादी काळापासून या देहाभिमानामुळे त्याच्याठिकाणी पर्वतप्राय पापे साचली आहेत. 

येथे 'पाप' हा शब्द पुण्य व पाप या दोहोंसाठी योजला आहे. भगवत्प्राप्ती करून न देणारे जे जे कर्म ते सर्व अध्यात्माच्या दृष्टीने पापच होय. श्रीमत् शंकराचार्य म्हणतात, “धर्मोऽपीह मुमुक्षूणां पापमेवोच्यते ।” (मुमुक्षूंच्या बाबतीत धर्मकर्मही पापच म्हटले गेले आहे.) श्रीमाउलीही म्हणतात, "स्वर्णा पुण्यात्मक पायें बेहजे। पापात्मकें पायें नरका जाइजे मग मातें जेणें पाविजे तें शुद्ध पुण्य ॥ (ज्ञाने, ९-३१६). जो नामस्मरणादिरूप भक्ती करीत नाही, त्याची पाप-पुण्यरूप दोन्ही प्रकारच्या पामुळे जन्म-मृत्युरुप संसारातून कधीच सुटका होत नाही. 

मूर्तीवर बज्रलेप केल्यानंतर तो जसा मूर्तीला पट्ट चिकटून बसतो, तसे पुण्य-पापाचे संस्कार सूक्ष्मदेहाला चिकटून बसतात. त्यासाठी माउलींनी युक्ती सांगितली ती भगवन्नामस्मरणाची. एका परमात्म्याशिवाय दुसरे काही नाही, असा ज्याच्या बुद्धीने निश्चय केला व ज्याची बुद्धी विषयसुखाची वासना सोडून देऊन सर्व कर्मे ईश्वराप्रीत्यर्थच करू लागली, तो पापपुण्यरहित होतो. 

तात्पर्य, भक्त नामस्मरणादिकांनी पापपुण्यरहित होतात आणि अभक्तांची त्यांच्या फळांचा भोग घेण्यावाचून सुटका नाही. शिवाय ती भोगताना नवीन पापपुण्ये होतच असतात. म्हणूनच त्यांना वज्रलेप होतात, असे म्हटले आहे.

ज्यांची सगुण भगवंतांच्या ठिकाणी आवडी नाही, ज्यांचा हरिनामावर विश्वास नाही, म्हणून जे नामस्मरणादी भक्ती करीत नाहीत, त्यांना अभक्त म्हणावे असा अभक्त श्रेष्ठ जातीत जन्मलेला असला, तरी पतितच होय. माउली म्हणतात, “तैसे भक्तिहीनाचे जिणे । जो स्वप्नींहि परी सुकृत नेणे तेणे संसारदुःखासि भाणे बोगरिले ।।" अभक्ताकडून परमेश्वरप्राप्तिकारक सुकृत स्वप्नातही घडत नाही. त्यामुळे त्याच्यापुढे संसाररूप ताटच नेहमी वाढलेले असते. 

ज्या नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती होते व जे उच्चारण्यासही कोणतेच कष्ट करावे लागत नाहीत, असे नामस्मरण न करणारे मानव दैवत म्हणजे हतभागीच म्हटले पाहिजेत. कारण भगवंतावर प्रेम आणि त्याच्या नामाचा उच्चार करण्याची इच्छा उत्पन्न व्हायची, तर पदरी पुण्याचा मोठाच साठा असायला हवा. "बहुता सुकृताची जोडी । म्हणुनि विठ्ठली आवडी ।" हेच खरे.

ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होते हे खरे. पण ते नुसते शब्दज्ञान नव्हे. 'अहं ब्रह्म अस्मि" असे नुसते तोंडाने म्हणणे हे झोपेतल्या बरळण्यासारखेच आहे. अशी वेदान्तशास्त्रातील अनंत वाक्ये अनंतवेळा उच्चारली तरी भक्तीवाचून भगवंत भेटणार नाहीत. मोरोपंत यावर छान सांगतात. ते म्हणतात, "हरिहरभक्ति - अनादर करिती धरिती मनात पंचदशी । त्यांच्या ज्ञानानीने जळे एकहि पटप्रपंचदशी ।।" 

(हरिहरभक्तीचा तिरस्कार करणाऱ्यांनी मनात सतत पंचदशी नावाच्या वेदान्तशास्त्राचे चिंतन केले, तरी त्यांच्या त्या शब्दज्ञानाच्या अग्नीने प्रपंचरूप वस्त्राची एक दशी म्हणजे एक दोरासुद्धा जळणार नाही.) ज्या ज्ञानाने भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, त्या भगवंताविषयीच भक्ती नसेल, तर त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे ! म्हणूनच अशा ज्ञानाला बरळ, म्हणजे अर्थहीन बडबड म्हटली आहे. अशा बडबडीने श्रीहरी दयाळू असले, तरी त्याला भेटणार नाहीत. नाथमहाराज म्हणतात,

"निर्विकल्प स्वरूपप्राप्ती। अवश्य करणें आहे चित्तीं । तैं करावी भगवद्भक्ती । उत्कट प्रीति अविश्रम ।।" मोक्षासाठी ज्ञान हवे असेल, तर तेही भगवंतच देईल, असा दृढविश्वास बाळगावा. गीतेत भगवंत म्हणतात,

" तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।

ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥। १०.१० ।। ”

( नेहमी प्रेमाने माझे भजन करणाऱ्यांना मी असे ज्ञान देतो की, ज्याने ते मला प्राप्त होतील.)

श्रीज्ञानेश्वरमाउली म्हणतात, हा परमात्माच आत्मा असून आम्हांला त्याच्यावाचून काहीच प्रमाण वाटत नाही. प्रत्यक्षादी प्रमाणे आणि त्या
प्रमाणांनी कळणारे जग आपल्याला कळते, ते या श्रीहरिरूप प्रमाणाने.

त्याच्या सत्तेने सर्व वस्तू सत्तावान आहेत. निर्गुण व सगुण ही श्रीहरीची दोन्ही रूपे व्यापकच आहेत. येथे 'हा आत्मा' असे म्हणून सगुण निर्गुणाचे ऐक्य दाखविले आहे. 'सर्वांघटीं' या पदाने सगुणाचे व्यापकत्व सांगितले. 'पूर्ण' या पदाने त्याच्या निरतिशय ऐश्वर्याचा बोध करून दिला. 'निधान' शब्दाने त्याच्या अनंत कल्याण गुणाचा निर्देश केला आणि 'नांदे' असे म्हणून अंतर्बाह्य सर्वत्र एका श्रीहरीचीच लीला असल्याचे सूचित केले. 
____________________________________

अभंग ८ | संतांचे संगती मनोमर्ग गती


संतांचे संगती मनोमार्गगति। आकळावा श्रीपति येणें पंथें ॥ १ ॥ 
रामकृष्ण वाचा भाव हाजिवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥ २ ॥ 
एकतत्त्व नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे || ३ || 
नामामृत गोडी वैष्णवां लाधली । योगियां साधिली जीवनकळा ॥४॥ 
सत्वर उच्चार प्रह्रादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ||५|| 
ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥
____________________________________

भावार्थ : 
संतांच्या संगतीत राहून मनाची विषयांकडील धाव थांबवून लययोगाने किंवा ध्यानयोगाने श्रीहरीला प्राप्त करून घेतले पाहिजे. वाचेने प्रेमपूर्वक रामकृष्णादी नामांचा जप करणे हेच जीवाचे शुद्ध स्वरूप आहे. रामजप हाच शिवाचा आत्मा आहे. एकतत्त्वस्वरूप श्रीहरीच्या ठिकाणी स्फुरणाऱ्या नामाचे साधन ज्याने साधले, त्याला द्वैताचे बंधन उरत नाही. या नामामृताची गोडी केवळ विष्णुभक्तांनाच लाभलेली आहे. पण योगसाधन करणाऱ्या योग्यांना केवळ जीवन दीर्घकाळ जगण्याची कला तेवढी साधली आहे. 

नारदांनी गर्भावस्थेतच प्रह्लादाला केलेला उपदेश दृढ श्रद्धेमुळे त्याच्या ठिकाणी पूर्ण ठसला आणि उद्धवाला त्याच्या अनन्य भक्तीमुळे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी ज्ञानाचा उपदेश केला. श्रीज्ञानदेवमाउली म्हणतात, सर्व साधनात नामोच्चारण हे अत्यंत सुलभ व श्रेष्ठ साधन आहे. शिवाय इतर साधनांनी हरिप्राप्ती कठीण आहे, हे एखादाच विरळा भाग्यवंत जाणतो.

विवरण: श्रीपती प्राप्त करून घेण्याचा मार्ग कोणता ? तर प्रथम सत्संग करावा. सत्संगामुळे हरिनाम, हरिनामाचे प्रेम, भगवत्कथा इ. आवडू लागते आणि त्यामुळे मनाचा जो स्वाभाविक ओढा विषयांकडे असतो, तो अनायासे नाहीसा होतो. मनाच्या या स्वभावाचे माउलींनी मोठे मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,

कां जें यया मनाचें एक निकें । जें हैं देखिले गोडीचिया ठाया सोकें । म्हणवुनि अनुभवसुखचि कवतुकें । दावीत

मनाचा एक मोठा गुण असा आहे की, जेथे सुखाचा अनुभव येईल, तेथे ते स्थिर होते. म्हणून त्याला परमेश्वराच्या अनुभवसुखाचे कौतुक दाखवीत राहावे. संतांच्या संगतीत हीच गोष्ट घडून येते. त्यामुळे मनाला विषयानुभवाचा कंटाळा येऊन ईश्वरानुभवात गोडी वाटू लागते. मनोमार्ग म्हणजे मनाची विषयसुखाकडील धाव. तिची गती म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी लय किंवा स्थिरता. संतांचे वागणे नेहमी सगुण भक्तिप्रेमाने भरलेले असल्यामुळे त्यांच्या संगतीत भक्तिप्रेमाचे शिक्षण अनायासे मिळते आणि त्या प्रेमाने श्रीहरी आपलासा करता येतो.

सगुण श्रीहरी हा आपला आत्माच होय असे कळून आल्यावर त्याच्यावर आत्मवत प्रेम जडते व त्यामुळेच त्याच्या नामावरही तसेच प्रेम जडते. त्या प्रेमामुळेच तुकाराममहाराज म्हणतात त्याप्रमाणे 'माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे ।।' अशी स्थिती होते. अशा रीतीने नामधारक भगवन्नाममय होऊन नामाच्या द्वारे श्रीहरीच्या ठिकाणी अखंड समरस होऊन राहातो. म्हणून जितक्या प्रेमाने नामस्मरणाचा वाणीला चाळा लागेल, तितका जीव प्रेमरूप होत जाईल. वाचेने हरिनामस्मरण करणे हेच जीवाचे शुद्ध प्रेमस्वरूप होय व ते नामस्मरणाने साधते. जीव अज्ञानी असल्याने प्रथम त्याला हे उमगत नाही. पण शिव ज्ञानी असल्यामुळे त्याला रामनाम हा आपला परमप्रिय आत्माच वाटतो. 'रामकृष्ण' हे नामस्मरण म्हणजे जीवाचे ठिकाणी श्रीहरीविषयी असलेले वाचिक प्रेमच होय. ज्याप्रमाणे मूल 'आई, आई' करून आईविषयीचे प्रेम वाचेने व्यक्त करते, तसाच जीव वाचेने नामस्मरण करून भगवंताविषयीचे प्रेम व्यक्त करतो.
एक तत्त्वी म्हणजे श्रीहरीच्या ठिकाणी. श्रीहरी हेच एक अद्वैत तत्त्व आहे. वस्तुत: शिव, जीव आणि जगत् या तीन वस्तू नसून एका श्रीहरीच्या ठिकाणी या तीन वस्तूंची कल्पना जीवाने केली आहे. आणि ही द्वैतकल्पनाच जीवाच्या संसारदुःखाला कारण आहे. एका प्रेमभक्तीने अखंड भगवदाकार चित्त राहिल्यास जगाचा आभास किंवा द्वैताचा आभास पूर्ण मावळतो. अत्यंत एकतत्त्वरूप सगुण श्रीहरीला प्राप्त करण्याकरता ज्यांनी नामस्मरणरूपसाधनाचा उपयोग करून श्रीहरीला अंतःकरणात साठवले, त्यांना सर्वत्र श्रीहरीच्याच सत्तेचा अनुभव येत असल्यामुळे द्वैताचा भास मुळीच उरत नाही. भगवंताचे नाम व रूप दोन्ही निरुपाधिकच आहेत. नामस्मरणाच्या द्वारा श्रीहरीच्या दिव्य रूपाचे ध्यान होऊन सर्वत्र एकतत्त्वरूप श्रीहरीचाच प्रत्यय येतो.

भगवंताचे नाम हेच खरे अमृत आहे. स्वर्गातील अमृत हे फक्त आयुष्याचा काळ वाढविणारे आहे. अविनाशी करणारे नाही. पण हरिनामामृताचे सेवन हरिरूप करणारे आहे. याची गोडी फक्त हरिभक्तांनाच कळते. विषयाकडील मनाची ओढ थांबवून भगवंताकडे प्रेम लागण्याकरता प्रथम जरी नामस्मरण साधकाला प्रयत्नपूर्वक करावे लागेल, तरी पुढे ते स्वाभाविक होते. इतकेच नाही तर भगवत्प्राप्तीनंतरही अखंड चालू राहाते. सगुण भगवंताविषयी अखंड प्रेममय अंतःकरण असणे, हीच भक्ताची जीवन्मुक्त स्थिती आणि विदेह मुक्ती होय. भक्तीवाचून योगाचा अभ्यास करणाऱ्यांना हे प्रेमसमाधीचे सुख मिळत नाही. चांगदेवांना ज्ञानदेवांच्या भेटीनंतर हे सुख मिळाले. योगाभ्यासाने चौदाशे वर्षांचे आयुष्य त्यांनी मिळवले पण त्या आयुष्याची सार्थकता भक्तांच्या भेटीनंतर झाली.

एका नामस्मरणाने प्रह्लाद पूर्ण भगवत्स्वरूप झाला आणि उद्धवाला भगवंतांनी मुक्तीवरील भक्तिरूप नामस्मरणाचा उपदेश केला. या उदाहरणांवरून हेही सिद्ध होते की, श्रीगुरुकृपेनेच हरिनामाचे प्रेम उत्पन्न होते आणि श्रीगुरुमुखाने घेतलेले नाम साक्षात्कार करून देते.

श्रीज्ञानदेवमहाराज म्हणतात, हरिनाम हे अत्यंत सोपे व अचूक साधन आहे. इतर साधने कठीण आहेत. शिवाय त्यात विघ्नेही उत्पन्न होतात.. पण नामस्मरणाची ही योग्यता जाणून त्यावर विश्वास ठेवणारा मात्र दुर्मिळ असतो. कारण,

जन्म तरीच नाम जन्मांतरी असेल जिह्वाग्री येईल पुण्यसामुग्री । श्रीरामाचे ॥
 
____________________________________

अभंग ९ | विष्णुविणे जप व्यर्थ त्याच ज्ञान 


विष्णुविणे जप व्यर्थ त्याच ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ 
उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥ २ ॥ 
द्वैताची झाडणी गुरूविणें ज्ञान । त्या कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ 
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥
____________________________________

भावार्थ : 
रामकृष्णांच्या ठिकाणी ज्याचे मन रमत नाही, म्हणून जो विष्णूशिवाय इतर देवतांच्या नामाचा जप करतो, त्याचे ज्ञान व्यर्थ होय. मनुष्यजन्माला येऊन ज्याने अद्वैताचा मार्ग किंवा अद्वितीय असा नामस्मरणाचा मार्ग जाणला नाही, तो अभागीच होय. नामस्मरणाशिवाय रामकृष्णांच्या नामरूपांत मनाची स्थिरता कशी होईल बरे?' सद्गुरूवाचून द्वैतबुद्धी नाहीशी होऊन भगवत्स्वरूपाचे ज्ञान कसे होईल बरे? आणि हे ज्ञान झाल्यावाचून हरिनामसंकीर्तन घडू शकत नाही. 
श्री ज्ञानेश्वरमाउली म्हणतात, हरिनामपाठाने अंतःकरणात श्रीहरीचे सगुण ध्यान उसले आणि त्यामुळे प्रपंचाचा भास मावळला.

विवरण: 
येथे 'विष्णु' शब्दाने विष्णूचे रामकृष्णादी अवतार गृहीत धरले आहेत. म्हणून केवळ विष्णुनामाचाच जप करावा, असा 'विष्णुविणे' याचा अर्थ नाही. तसेच 'विष्णुविणे' याचा अर्थ शिवनामाचा जप करू नये, असाही नाही. कारण वारकरी संप्रदाय हरि-हरांमध्ये भेद मानत नाही.

हरिहरा नाही भेद करू नये वाद ॥ १ ॥ उजवे वाम भाग। तुका म्हणे एकचि अंग ॥२॥ 

एकच परब्रह्म सत्त्वगुणाच्या आश्रयाने विष्णुरूपाने जगत्पालन करते तर तमोगुणाच्या आश्रयाने शिवरूपाने जगाचा संहार करते. तुका म्हणे भक्तीसाठी हरिहर । अरूपाचे अक्षर विभाग हे ॥

शिव-विष्णू ही दोन्ही रूपे परब्रह्माची अविनाशी रूपे आहेत. म्हणून शिव-विष्णू किंवा त्यांच्या अवतारांवाचून अन्य ज्या प्रापंचिक सुखे देणाऱ्या देवता आहेत, त्यांच्या काम्य जपाचा येथे निषेध केला आहे.
उपाधीच्या अपेक्षेने ब्रह्माचे कारणब्रह्म व कार्यब्रह्म असे दोन भेट होतात. श्रीमत् शंकराचार्यांनी “अस्ति ब्रह्म नित्यशुद्धबुद्धमुक्तस्वभावं सर्वज्ञं सर्वशक्तिसमन्वितम्" असे जे परब्रह्माचे लक्षण केले आहे, ते कारणब्रह्म होय,कारणब्रह्म निरुपाधिक असून कार्यब्रह्म सोपाधिक आहे. कारणब्रह्माचे सामर्थ्य अमर्याद असून कार्यब्रह्माचे मर्यादित आहे. सगुण साकार शिव व विष्णू हे निरुपाधिक कारणब्रह्मच असून त्याचे अवतारही कारणब्रह्मच आहेत व तेच भक्तीचे आलंबन आहेत. त्यांच्याखेरीज अन्य देवता या सोपाधिक व मर्यादित सामर्थ्याच्या आहेत. 

त्यांच्या नामजपाचा येथे निषेध केला आहे. कारण त्यांच्या नामजपाने त्या संतुष्ट झाल्या, तर ऐहिक वा पारलौकिक सुखे मिळवून देतील पण श्रीहरीची प्राप्ती करून देणार नाहीत. त्याचप्रमाणे अशा लोकांना निरुपाधिक हरिहरांच्या भक्तीवाचून अनुभवजन्य अद्वैत ज्ञानही होत नाही.

मनुष्यजन्माचे परम ध्येय भगवत्प्राप्ती हेच होय. जो मनुष्यजन्म प्राप्त होऊनही हे ध्येय साध्य करीत नाही, तो करंटा म्हणजेच दुर्दैवी होय. बरे ! हे ध्येय साध्य करण्यासाठी फार कष्टही नाहीत. 

नामस्मरणासारखा अतिशय सोपा अद्वितीय मार्ग दुसरा नाही. शिवाय या साधनाने अद्वय अशा मोक्षमार्गाची प्राप्ती होते. असे रामकृष्णनाम जो कोणी घेत नाही, त्याचा रामकृष्णाच्या नामरूपाच्या ठिकाणी प्रवेश होत नाही आणि त्याला परमानंदरूप मोक्षही | मिळू शकत नाही.

द्वैताचा अनुभव हाच सर्व दुःखांचे कारण होय. त्याची पूर्ण निवृत्ती | झाली, तरच आनंदरूप श्रीहरीशी समरस होऊन स्वत:ला आनंदरूप होता येते. ही स्थिती प्राप्त होण्याकरता श्रीहरीच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान झाले पाहिजे. हे ज्ञान स्वानुभवी सद्गुरूच करून देऊ शकतात.

“सद्गुरूवांचोनी नाम नये हाता । साधन साधितां कोटिगुणे ॥ १ ॥ नामदेव म्हण सद्गुरूपासोनी । नाम घ्या जाणोनी नाना काही ॥४॥ गीतेत भगवंतांनीही ज्ञान सद्गुरूंकडूनच घेण्यास सांगितले आहे.
“उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ।" (४.३४) (साक्षात्कारी व शास्त्रज्ञानी गुरू तुला ज्ञानाचा उपदेश करतील.)

असे ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय नामसंकीर्तन घडू शकत नाही. श्रीसद्गुरुकृपेने श्रीहरीचे यथार्थ ज्ञान, ज्ञानामुळे श्रीहरीविषयी स्वाभाविक असीम प्रेम आणि त्या प्रेमामुळे त्याच्या नामरूपाचे अखंड स्मरण व चिंतन होऊ लागते. 

वेदान्ताची पुस्तके वाचून स्वबुद्धीने मिळविलेले शाब्दिक ज्ञान व्यर्थ आहे. त्याने भगवत्स्वरूपाचा अनुभव येऊ शकत नाही. म्हणूनच माउली म्हणतात,
अंतःकरण बोधलें । संकल्पा नये ॥
“जेणें जयाचेनि वाक्य उजियडें । जाहलें चित्त ब्रह्माचेनि पाडें निःशंक होय ।। ऐसें ज्ञानप्रकाश पाहेल तैं मोहांधकार जाईल । जैं श्रीगुरुकृपा होईल । पार्था गा ।" (ज्ञाने. अ. ४-१६८-१७१)
निधडें ।

श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात, ज्या श्रीहरीचे नामस्मरण करायचे त्याचे ध्यान सगुण आहे. नाम आणि रूप यांचा नित्य संबंध असल्यामुळे नाम घेतल्याबरोबर रूपही लक्षात येते.

'श्रीहरी सगुण आहे' याचा अर्थ तो षड्गुणैश्वर्यसंपन्न आहे. पण सत्त्व- रज-तम या मायागुणांनी रहित आहे; म्हणून निर्गुण आहे. तो साकार दिसतो तेव्हा त्याचा आकार मायेच्या गुणांनी तयार झालेला नसून भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी तो स्वतःच्या इच्छेनुसार आकार धारण करतो. म्हणूनच तर जन्माच्या वेळी श्रीकृष्णांनी वसुदेव-देवकींना चतुर्भुज रूप दाखविले आणि त्यांच्या प्रार्थनेवरून पुन्हा बालरूप धारण केले. असेच इतरही अनेक प्रसंग पुराणांत आलेले आहेत. 

अशा रीतीने श्रीहरी सगुण-साकार असूनही निरुपाधिक आहे. म्हणून सगुण श्रीहरीची प्राप्ती हीही निर्गुण परब्रह्माचीच प्राप्ती होय. याच अर्थाने माउली म्हणतात की, मला सगुण ध्यानाने प्रपंचाचा विसर पडला.
प्रारब्धबळाने भक्तिरहित ज्ञान्याला समाधी अवस्थेखेरीज अन्य वेळी जग सत्य वाटते, तसे भक्तांचे होत नाही. त्यांना अखंड भगवत्प्रेमरूप समाधी असते, त्यामुळे प्रपंचाचा निःशेष विसर पडतो. भक्तप्रेमाने सच्चिदानंदघन साकार झालेला परमात्मा नामस्मरणाने भक्तहृदयात शिरला म्हणजे त्या अंत:करणात जगत्स्फूर्तीला वाव नसतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad