Type Here to Get Search Results !

अधिक मास मराठी माहिती | धोंड्याचा महिना | जन्मकथा | आरती | व्रत नियम| adhik maas 2023

सर्वसामान्यपणे तीन वर्षांनी अधिकमास येतो. अधिक मास मराठी माहिती जाणून घ्या. धोंड्याचा महिना चैत्रापासून फाल्गुनापर्यंत १२ महिन्यांत ३५५ दिवस येतात आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस ३६५ असतात. हे १० दिवस तीन वर्षांनी ३० दिवस झाल्यावर एक महिना अधिक घालून हे पुन्हा सारखे होतात. - adhik maas 2023

अधिक मास मराठी माहिती  | धोंड्याचा महिना | जन्मकथा | आरती | व्रत नियम| adhik maas 2023
adhik maas 2023


अधिक मास मराठी माहिती adhik maas 2023

काटेकोरपणाने दर तेहेतीस महिन्यांनी अधिक मास येतो. सूर्य वर्षातील १२ राशीपैकी प्रत्येक महिन्यात एकेक रास बदलतो. प्रत्येक राशीत सूर्य जातो त्याला संक्रांत म्हणतात. अशा मेष राशीपासून मीन राशीपर्यंत एका वर्षात १२ संक्रांती होतात. 

चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत बारा महिन्यांत प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते. यात बदल होत होत ३३ महिन्यांनी असा महिना येतो, की त्यात संक्रांत नसते. 

अलीकडच्या महिन्यात अमावस्येला संक्रांत असते आणि पुढील महिन्यात प्रतिपदेला संक्रांत येते. 

त्या बिन संक्रांतीच्या महिन्याला अधिक महिना म्हणतात. अधिक महिन्याला पुढच्या महिन्याचे नाव देतात. म्हणजे भाद्रपद महिना असेल तर श्रावण महिन्यानंतर अधिक भाद्रपद महिना येतो.

अधिक महिना मोठ्या पर्वाप्रमाणे असतो व त्या महिन्यात धार्मिक कृत्ये करतात. अधिकमास माहात्म्य वाचतात. - ( अधिक मास मराठी माहिती


अधिकमासातील व्रते व नियम adhik Mahina 

अधिक महिन्यात संक्रांत नसल्यामुळे चंद्रसूर्यांच्या गतीत फरक पडतो. यामुळे वातावरणातही बदल होत असतो. याचा आपल्यावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून काही नियम व व्रते पाळावीत. यामुळे मनुष्याला सुख, शांती, समाधान मिळते, त्यांचे इच्छित मनोरथ पूर्ण होतात, त्यांची प्रगती होते. पुढे काही व्रते व नियम दिले आहेत. त्यातील जे जमतील त्यांचे पालन करावे.

नियम

  • १) रोज एकदाच फलाहार करावा. 
  • २) नक्त, भोजन करावे. (दिवसा न जेवता फक्त, रात्री पहिल्या प्रहारात एकदाच जेवावे.) 
  • ३) महिनाभर मीठ खाऊ नये. 
  • ४) रोज तेलाचा किंवा तुपाचा दिवा देवापुढे सतत तेवता ठेवावा. 
  • ५) तेहतीस अनारसे, जावयाला दान द्यावे. (अनरशांऐवजी ३३ बत्तासे, खारका, सुपाऱ्या किंवा फळे दिली तरी चालतात.) 
  • ६) रोज गोग्रास देणे. 
  • ७) हरिविजय (प्रकाशक-धार्मिक प्रकाशन संस्था) ग्रंथाचे एका महिन्यात पूर्ण पारायण करावे. 
  • ८) अधिकमास माहात्म्य पोथी (प्रकाशक- धार्मिक प्रकाशन संस्था) किंवा पुरुषोत्तममास माहात्म्य पोथी (प्रकाशक - धार्मिक प्रकाशन संस्था) यांपैकी एका ग्रंथाचे महिन्यात पूर्ण पारायण करावे. 
  • ९) भक्तकवी मिलिंद माधवकृत अधिकमास माहात्म्य या पोथीचे रोज पारायण करावे.

वरीलपैकी कोणत्याही व्रताची सुरुवात करताना अगर उद्यापनाच्या वेळी भक्तकवी मिलिंद माधवकृत अधिकमास माहात्म्याच्या एकवीस प्रती अन्य भक्तांना वाटाव्यात.



अधिकमासाची जन्मकथा | adhik maas 2023 

एकदा महातपस्वी भगवान नारायण लोककल्याणासाठी तपश्चर्या करीत बसले असताना नारदमुनींची स्वारी तिथे आली. 

त्यांच्या येण्याचे कारण विचारता नारदमुनी म्हणाले, हे तपस्वी श्रेष्ठा, दरवर्षी फक्त बाराच महिने असतात. मग दर तीन वर्षांनी हा तेरावा महिना कसा येतो ? कृपा करून या अधिक महिन्याची उत्पत्ती कशी झाली ते मला सांगा."

तेव्हा नारायण म्हणाले, "मुनिवर्या, विश्वाचे कल्याण अगर अकल्याण हे सत्कर्माच्या आणि दुष्कर्माच्या प्रमाणांवर अवलंबून असते. 

आजकाल दुष्कृत्याचेच प्रमाण वाढल्यामुळे, ते पाप आपल्याला सहन होत नाही, अशी बाराही महिन्यांची केव्हापासूनची तक्रार होती. त्या पापाचे जड ओझे बारा महिन्यांच्या पोटांत मावेनासे झाले. 

त्यामुळे त्या बाराही महिन्यांनी आपापल्या पोटांतील पापाचा फक्त तिसराच हिस्सा बाहेर काढून टाकला. आपला पापभार तेवढा कमी केला. 

परंतु बाराही महिन्यांनी काढून टाकलेल्या त्या पापभागांपासून तेरावा महिना म्हणजेच अधिकमास उत्पन्न झाला. तो पापमय असल्याने त्याला मलिनमास किंवा मलमास असे नाव पडले. - ( अधिक मास मराठी माहिती )

पुढे श्रीविष्णूच्या आणि पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या आशिर्वादाने तो मलमास पवित्र पुरुषोत्तममास कसा बनला, या अधिकमासात 
  1. तीर्थयात्रा, 
  2. तीर्थस्नान, 
  3. दानधर्म, 
  4. उपास, 
  5. पूजाअर्चा, 
जप वगैरे धर्माचरण केल्याने पुण्यलाभ होऊन जीवनाचे सार्थक कसे होते आणि पुरुषोत्तम व्रताने जीवन सुखमय, शांतीमय आणि समृद्धीमय कसे बनते, ते या पोथीत भक्तकवि मिलिंदमाधव यांनी आपल्या प्रासादिक, रसाळ भाषेत ओवीबद्ध रूपाने सांगितले आहे. जोडीला प्रसंगचित्रे देऊन पोथी आकर्षक व सुबोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

अधिकमास पाळणाऱ्या स्त्रीपुरुषांनी महिनाभर एकभुक्त राहून पुरुषोत्तम व्रत करावे. संबंध अधिकमासांत प्रत्येक दिवशी ही पोथी सकाळी, दुपारी व संध्याकाळी वाचावी अगर ऐकावी. 

निदान सोयीप्रमाणे एकदातरी तसे करावे. अधिकमासाच्या आरंभी अगर अखेरीस २१ भक्तांना या पोथ्या दान कराव्यात. अधिकमास माहात्म्य व पुरुषोत्तम व्रतकथा' वाचल्याने अगर ऐकल्याने भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन भक्तांचे कल्याण करतो, असे शास्त्रवचन आहे.

कहाणी अधिकमासाची ( पुरुषोत्तम मास कथा )

ऐका पुरुषोत्तमदेवा तुमची कहाणी. सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा धरावी, पुरुषोत्तमाची पूजा करावी. पुण्य मिळते, पाप पळते. मनीं धरावें तें मिळतें, जन्माचे सार्थक होतें.

अवंतीपूर नावाचं एक नगर होतं. तिथे दोघे भाऊ राहात होते. मनानं श्रीमंत

परंतु धनानं गरीब. मोठ्याच्या बायकोचं नांव होतं रूपवती. धाकट्याच्या बायकोचं

२७ नांव होतं मुग्धा. एकदां ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठीं परगांवी गेले. तेव्हांपासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही. 

धाकट्या जावेकडून बटकीसारखी काम करवून- घेई. तिच्यावर सारखी आग पाखडी. एकदां तर थोरली एवढी संतापली कीं तिनं धाकटीला घराबाहेर काढलं. बिचारी धाकटी, एका शेजारणीच्या ओसरीवर राहूं लागली.

त्या वर्षी अधिकमास आला. थोरलीनं पुरुषोत्तमव्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही तें व्रत करावं. 

म्हणून ती थोरल्या जावेच्या घरीं गेली, म्हणाली, जाऊबाई जाऊबाई, पुरुषोत्तमव्रत करायची माझी इच्छा आहे. परंतु मला त्या व्रताची कांहीच माहिती नाहीं. तुम्ही मला सगळा व्रतविधि सांगाल का ?

थोरली होती कपटी आणि भारी दुष्ट. ती धाकटीला म्हणाली, तूं आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते. 

पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन तें दुसऱ्या कोणालाच सांगायचं नाहीं. धाकटीनं कबूल केलं. थोरलीनं दुष्टपणानं उगीच काहीतरी खोटंनाटं रचून तिला सांगितलं. 

म्हणाली, अधिकमास म्हणजे मलिनमास. या महिन्यांत आपणही मलिन राहायचं. मलिन गढूळ पाण्यांत स्नान करायचं. मळकट वस्त्रं वापरायचीं, शिळेपाके उष्टेखरकटे पदार्थ खायचे. 

घाणेरडे शब्द उच्चारायचे. उजवलेला नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा पिंपळा, माझ्या घरी जेवायला ये. असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल.

धाकटीला में खरं वाटलं. ती रोज घाणेरडी राहू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरीं जेवायला बोलावू लागली. होतां होतां उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं १०८ ब्राह्मणांना जेवायचं आमंत्रण दिलं. 

तिचं ऐकून धाकटीनंही ब्राह्मणांना जेवायला बोलावलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिली नाही. रोजच्या प्रमाणं ती पिंपळाला म्हणाली, देवा देवा, माझ्या घरीं आज उद्यापन आहे. 

तूं जेवायला ये. तेव्हां पिंपळातून श्रीविष्णु प्रगट झाला. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून तो तिला म्हणाला, ठीक आहे. मी जेवायला येतो. कोणी विचारलंच तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग.

धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरांत काय होतं नव्हतं तें गोळा करून कसाबसा स्वयंपाक केला. एक लाडू केला. तेवढ्यांत श्रीविष्णु जेवायला आला. तो तिला म्हणाला, ताई, बाहेर १०८ ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटी

तँ विसरूनच गेली होती. धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नव्हतं, मग १०८ ब्राह्मणांना कसं जेवण घालणार ? घरांत अन्नाचा आणखी एकही दाणा नव्हता. आतां काय करायचं ? विष्णूनं तिची चिंता दूर करायचं ठरवलं.

तो म्हणाला, आतां असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीनं विष्णूच्या सांगण्याप्रमाणं केलं. मग विष्णूनं त्या पानाचे १०८ तुकडे केले. द्रोणाचे १०८ तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले.

धाकटीनं ती पानं मांडली. लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हां श्रीविष्णूच्या कृपेनें १०८ पात्रं पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण आले जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद देऊन गेले.

तिकडे थोरलीच्या परी चमत्कार झाला. तिनं तयार केलेले सर्व पदार्थ नाहींसे झाले. १०८ ब्राह्मण उपाशी राहिले. रागानं तिला शाप देत निघून गेले. 

परंतु धाकटी अगदी गरीब आहे. तशांत आपण तिला खोटंनाटं सांगितलं आणि तरीही तिनं १०८ ब्राह्मणांना भोजन कसं दिलं, याचं थोरलीला नवल वाटलं. ती तशीच लगबगीनं धाकट्या जावेकडे गेली. धाकटीनं थोरल्या जावेला आदरानं लवून नमस्कार केला. म्हणाली, तुम्हीं सांगितल्याप्रमाणं मी अधिकमासाचं व्रत केलं. 

म्हणूनच भगवान श्रीविष्णु प्रसन्न झाले. आणि त्यांच्या कृपेनंच उद्यापन देखील यशस्वीपणानं पार पडलं. धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिनं ते खरं मानून भक्तीभावानं व्रत केलं, म्हणूनच तिला भगवान विष्णु प्रसन्न झाले, हे थोरलीनं मनोमन जाणलं. ती खजील झाली. तिनंधाकटीचे पाय धरले. तिची क्षमा मागितली. तेव्हां आकाशवाणी झाली.

जे कोणी श्रद्धेनें अधिकमास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईन. त्यांच्या सर्व मनकामना पूर्ण करीन..


त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदांत वागूं लागल्या. श्रीपुरुषोत्तमाच्या कृपेनं त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या. 

त्यांना जशी सुखसंपत्ती मिळाली, तशीच त्या श्रीपुरुषोत्तमाचे कृपेने तुम्हाआम्हाला मिळो ! ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सफल संपूर्ण. ॐ विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः ॥


आधिकमास आरती | पुरुषोत्तम मास आरती 


जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम । सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥ धृ० ॥

दीन म्हणोनी कृष्णे उद्धार केला ॥ निज नामे 'पुरुषोत्तम' धन्य तुला केला ।। दाने त्यागे स्नाने पूजा जप माला ।। व्रताचरण फलदायी निश्चय ठरवीला ।। निःस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य ।। सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ।। जय जय अधिकमास ० ॥ १ ॥ 

पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला । मेधावी-कन्येला तो नच आवडला । परि शिवपूजा करण्या सांगुनिया तिजला || पांडवपत्नी म्हणूनी जन्म धन्य केला ॥ वनवासी पंडुसुता कथिले महिमान || सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिकमास० ॥ २ ॥ 

अधिक मासामाजी दाने जे देती । दीप निरंतर देवापुढती लाविती ॥ राधाकृष्णांची ही पूजा जे करिती ।। अथवा उपवासा मासभरी धरिती ।। अनारसे तेहतीस जामाता दान ॥ सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥ जय जय अधिकमास० ॥ ३ ॥

दृढधन्व्याला पोपट करितो उपदेश ।। गतजन्मीची सांगे पुण्याई त्यास । अधिक मासी घडता स्नाने उपवास ।। पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास ॥ सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण ॥ सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥ जय जय अधिकमास०॥४॥

रानी मणिग्रीवाते उग्रदेव बोले ।। पुरुषोत्तम मासाचे व्रत त्या सांगितले ॥ त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले ॥ चित्रबाहु म्हणुनिया वैभव भोगियले ॥ सहज जरी व्रत घडले तरि होई धन्य ॥ सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥ जय जय अधिकमास० ॥ ५ ॥

कदर्यु आख्यान नारायण कथिती ।। दुर्गति होऊनियाही प्राप्त पुण्य अंती ॥ वानर-जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती ॥ मासभरी उपवासे तयास होई ती ।। कथा पुराणा मधल्या कित्येक अन्य ॥
सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥ जय जय अधिकमास० ॥ ६ ॥

धर्म सत्य मर्यादा नीती आचरणी ।। कैसे पुण्य करावे दंपति जीवनी । अनेक ऋषि वचने ऐकावी श्रवणी ।। माहात्म्य पोथी वाचन करणे सर्वांनी ॥ निःस्वार्थे वागावे तोच धर्म मान्य ॥ सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥ जय जय अधिकमास०॥७॥

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad