Type Here to Get Search Results !

संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ | अभंग १० ते १८ | माऊलींचा हरिपाठ अर्थासहीत |

वाचा संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ अभंग १० ते १८ पर्यंत इथे संपूर्ण विस्तारपूर्वक अर्थ विवरण दिलेले आहे. माऊलींचा हरिपाठ अर्थासहीत वाचा....

संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ | अभंग १० ते १८ | माऊलींचा हरिपाठ अर्थासहीत |
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ 




संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ | अभंग १० ते १८ |

🚩 अभंग १० | त्रिवेणी संगमीं नाना तीर्थे भ्रमीं ।

त्रिवेणी संगमीं नाना तीर्थे भ्रमीं । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥ १ ॥ 

नामासी विन्मुख तो नर पापिया। हरिवीण धांवया न पवे कोणी ॥ २ ॥ 

पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक । नामें तिन्ही लोक उद्धरती || ३ || 

ज्ञानदेव म्हणे नाम जपे हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ||४||

- संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ

🚩 भावार्थ

गंगा, यमुना, सरस्वती या तीन पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमात स्नान केले किंवा यासारख्या अनेक तीर्थक्षेत्री जाऊन स्नानदानादी केले; पण श्रीहरीच्या नामस्मरणात प्रेमभाव नसेल, तर सर्व व्यर्थ आहे. हरिनामाविषयी जो विन्मुख असेल, तो मनुष्य पापीच होय. अशा पाप्याचा उद्धार श्रीहरीशिवाय दुसरा कोण करू शकणार आहे ? नामस्मरणाने उद्धरून गेलेले, पुराणरचनेमुळे प्रसिद्ध असलेले वाल्मीकी ऋषी स्वानुभवाने सांगतात की, नामानेच तिन्ही लोकांचा उद्धार होतो. श्रीज्ञानदेव महाराज म्हणतात, जो हरिनामाचा जप करतो, त्याचे कुळ पिढ्यानपिढ्या शुद्ध होते. ( dnyaneshwar mauli haripath)

🚩 विवरण: 

पापे ही भगवत्प्राप्तीला प्रतिबंधक असतात. संसारातील निरनिराळी दुःखे हेही पापाचेच फळ आहे. निरनिराळ्या प्रकारची पापे नाहीशी होण्यासाठी तीर्थाटन करण्याची शास्त्रांची आज्ञा आहे. पवित्र तीर्थात श्रद्धापूर्वक स्नान करण्याने चित्त शुद्ध होते. चित्तातून राजस, तामस पापवासना निघून गेल्या की चित्त सात्त्विक बनते. 'सत्त्वात् संजायते ज्ञानम्' सत्त्वगुणामुळेच ज्ञान उत्पन्न होते. भगवत्साक्षात्कारासाठी सत्त्वगुणाचीच आवश्यकता आहे. भगवंतांनी तीर्थांच्या ठिकाणी सत्त्वगुणाचा उत्कर्ष करण्याचे सामर्थ्य ठेवले. - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ


🚩 अभंग ११ | हरि उच्चारणीं अनंत पापराशी

हरि उच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥ १ ॥ 

तृण अग्निमेळें समरस झालें । तैसे नामें केलें जपतां हरि ॥२॥ 

हरि उच्चारणीं मंत्र हा अगाधा । पळे भूतबाधा भेणें याचे ||३|| 

ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थन करवे अर्थ उपनिषदां ||४||


🚩भावार्थ :

 'हरि' नामाच्या उच्चाराने अनंत पापांचे ढीग क्षणभरात लयाला जातात. ज्याप्रमाणे (वाळलेले गवत आगीला मिळताच आगरूप होऊन जाते, तसे हरिनामाच्या जपाने पापाचे भस्म होऊन साधक हरिरूप होतो. हरिनामाचा उच्चार हा एवढा प्रभावी मंत्र आहे की, याच्या भयाने भूतबाधा नाहीशी होते. श्रीज्ञानदेवमहाराज म्हणतात, माझा हरी एवढा सामर्थ्यवान आहे की, त्याचे सामर्थ्य व स्वरूप उपनिषदांनाही न कळण्यासारखे आहे. - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ

🚩विवरण

भगवंतांच्या नामाचा महिमा अगाध आहे. कारण नाम व नामी एकरूप असल्यामुळे भगवंत जसे षड्गुणैश्वर्यसंपन्न आहेत, तसेच त्यांचे नामही आहे. ( dnyaneshwar mauli haripath) कित्येक ठिकाणी तर भक्तांनी भगवंताहून त्यांचे नाम अधिक श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. 'राम' या केवळ नामाने पाषाण समुद्रावर तरल्याचे रामायणात वर्णन आहे. कविवर्य मोरोपंत केकावलीत म्हणतात-

तुम्हां समचि हें गुणें, अणु उणें नसे नाम, हा । दिसे अधिकही तसा गुण तुला असेना महा ॥ सदैव भलत्यासही सुलभ आणखी गायका ।

(हे जगन्नायका, तुमचे नाम तुमच्यासारखेच श्रेष्ठ आहे. त्यात तुमच्याहून जराही उणेपणा नाही. उलट त्यात हा अधिक गुण आहे की, ते कोणाही भक्ता-अभक्ताला सहज घेता येण्यासारखे आहे.)


🚩 अभंग १२ | तीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धि 

तीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धि । वायांचि उपाधि करिसी जना ॥१॥ 

भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे। करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥ 

पारियाचा रवा घेता भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥ 

ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥

🚩भावार्थ : 

अंत:करणात भगवत्प्रेम नसेल तर तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, नेमधर्म इत्यादी साधनांनी भगवंताची प्राप्तिरूप सिद्धी मिळत नाही. हे माणसा, हे तुझे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. हातावर ठेवलेला आवळा जसा स्पष्ट दिसावा, तसा भावबळाने भगवंत स्पष्ट दिसू लागतो, कळू लागतो. त्याखेरीज अन्य कशानेही कळत नाही.  ( dnyaneshwar mauli haripath) 


जमिनीवर पडलेला पाऱ्याचा कण उचलून घेण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो उचलून घेता येत नाही. त्याप्रमाणे शुद्ध भावावाचून केलेल्या साधनांनी भगवंतांचे आकलन होत नाही. श्रीज्ञानदेवमहाराज म्हणतात, श्रीनिवृत्तिनाथ हे मायागुणरहित असून त्यांनी या निर्गुण ज्ञानाचे संपूर्ण रहस्य माझ्या हाती सोपविले. त्यामुळे भगवत्स्वरूपाचे मला आकलन झाले. - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ


🚩विवरण

तीर्थयात्रा करणे; अनेक प्रकारची व्रते, उपवास करणे; प्रातः स्नान, विशिष्ट वस्तू खाणे किंवा सोडणे यांसारखे नियम करणे ही सर्व वेगवेगळ्या शास्त्रांनी ईश्वरप्राप्तीची साधने म्हणून सांगितली आहेत. परंतु अंतःकरणात जोपर्यंत भगवंतांविषयी निःसीम प्रेम नसेल, तोपर्यंत यंत्रवत केलेल्या अशा प्रकारच्या साधनांचा काहीही उपयोग होणार नाही. ( dnyaneshwar mauli haripath) 

 माउलींनी ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात ही कर्मे कशी करावीत, याविषयी स्पष्ट दिग्दर्शन केले आहे. माउली म्हणतात- - "अर्जुना, तू जी जी कामे करशील, जे जे भोग भोगशील, नाना यज्ञयाग करशील, सत्पात्री दान देशील, सेवकांना वेतन देशील, नाना प्रकारची तपादी व्रते, साधने करशील, त्या सर्व क्रिया ज्या रीतीने जशा होतील तशा माझ्या प्रीत्यर्थ माझे ध्यान ठेवून करीत जा. पण मनात 'मी अमुक केले' अशी कर्तृत्वाभिमानाची जराही आठवण येणार नाही अशा रीतीने स्वच्छ धुऊन ती कर्मे मला अर्पण कर.' " - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ


व्यवहारात आपण पाहतोच की, प्रत्येक कर्माच्या मागे "मी केले" हे असतेच. "मी अमुक तीर्थयात्रा केल्या, इतक्या देणग्या दिल्या, इतके नोकर-चाकर मी पोसतो” इत्यादी स्वरूपाची वाक्ये हरघडी आपण ऐकतो, बोलतो. ज्याला संसारचक्रातच जन्मोजन्म राहायचे असेल, त्याला हा भाव ठीक आहे. 


पण ज्याला भगवंतापाशी जायचे आहे, त्याने माउलींचे म्हणणे ध्यानात घेऊन त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कर्तृत्व-भोक्तृत्व हीच जीवाची उपाधी आहे. तीर्थयात्रादी साधनात हा कर्तृभाव सोडून देता आला आणि सर्व काही भगवत्प्रीत्यर्थ, त्यांच्या आज्ञेनेच आहे, हा भाव ठेवता आला, तरच परमार्थात त्यांचा उपयोग होतो. कर्तृत्व नसेल तर भोक्तृत्वही नाही. भोक्तृत्व नसेल, तर पुनर्जन्म नाही. संसारसागरातून पार होण्याची ही युक्ती आहे. ( dnyaneshwar mauli haripath) 


🚩 अभंग १३ | समाधि हरीची समसुखेंविण

समाधि हरीची समसुखेंविण । न साधेल जाण द्वैतबुद्धी ||१|| 

बुद्धीचे वैभव आन नाहीं दुजें । एका केशवराजें सकळ सिद्धी ॥२॥ 

ऋद्धिसिद्धिनिधि अवघीचउपाधी । जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥३॥ 

ज्ञानदेवा रम्य रमलें समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ॥४॥


भावार्थ

मी निराळा व देव निराळा अशी द्वैतबुद्धी जोवर आहे आणि 'जीव हाच ब्रह्म' असे ऐक्यज्ञान जोवर नाही, तोवर हरीशी ऐक्य साधणार नाही. सर्वत्र व्यापून राहिलेल्या परमात्म्याचा अनुभव घेणे, यातच बुद्धीचा मोठेपणा आहे. एका श्रीहरीच्या नामस्मरणानेच ही सिद्धी प्राप्त होते. जोवर त्या परमानंदस्वरूप श्रीहरीमध्ये मन रमत नाही, तोवर ऋद्धी, सिद्धी, निधी इ. सर्व काही उपसर्गच आहेत. श्रीज्ञानदेव महाराज म्हणतात, सर्वकाळ हरिचिंतनानेच मला रम्य समाधान प्राप्त झाले. - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ

विवरण

समसुख म्हणजे जीव व ब्रह्म सम आहेत, या ज्ञानामुळे प्राप्त होणारे सुख. अर्थात 'अहं ब्रह्म अस्मि' हे जीव व ब्रह्म यांच्या ऐक्याचे ज्ञान जेव्हा जीवाला होते, तेव्हा तो आत्मानंदाचा अनुभव घेऊ लागतो.


🚩 अभंग १४ | नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी

नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी। कळिकाळ त्यासी नातळती ॥१॥ 

रामकृष्ण वाचा अनंत राशी तप। पापाचे कळप जळती पुढे ||२|| 

हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा। म्हणती जे वाचा तयां मोक्ष ||३|| 

ज्ञानदेवा पाठ नारायण नाम। पाविजे उत्तम निजस्थान ||४||


भावार्थ: जो नित्यनियमाने अंतःकरणापासून हरिनामाचे स्मरण करील, त्याला कळिकाळाची मुळीच बाधा होणार नाही. वाणीने 'रामकृष्ण' जप केल्यास तपश्चर्येचे ढीगच्या ढीग पडतात. त्यामुळे पापांचे कळपच्या कळप जळून भस्मसात होतात. भगवान शिवदेखील हरिमंत्राचा जप करतात. म्हणून जे वाणीने त्या मंत्राचा उच्चार करतात, त्यांना खात्रीने मोक्ष प्राप्त होतो. ( dnyaneshwar mauli haripath)  श्रीज्ञानदेवमहाराज म्हणतात, जे 'नारायण' नामाचा नित्यपाठ करतात, त्यांना उत्तम असे स्वस्वरूप प्राप्त होते. - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ


विवरण : जो कोणी नित्य म्हणजे प्रतिदिवशी, सत्य म्हणजे मनापासून, आवडीने, कळकळीने, मित म्हणजे नियमित संख्येने हरिनामाचा जप करील, त्याला कळिकाळाचे भय नाही. कळिकाळ याचे दोन अर्थ होतात. 

१) कलियुगाचा काळ आणि 

२) कली व काळ. 

कलियुगाचा काळ अत्यंत दोषयुक्त मानला आहे. कृतयुगात जो धर्म चार पायांवर उभा असतो, तो कलियुगात केवळ एका पायावर कसाबसा उभा असतो. त्यामुळे वेदमंत्रांचे सामर्थ्य या कलियुगात शुद्ध आचारांच्या अभावी प्रत्ययाला येत नाही. म्हणूनच समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ( dnyaneshwar mauli haripath) 

यथासांग ते कर्म काही घडेना । घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना ॥ 

अशी कलियुगाची स्थिती आहे. परंतु या कलियुगाचा एक मोठा गुणसुद्धा आहे. भागवताच्या बाराव्या स्कंधात तिसऱ्या अध्यायात शुकमहाराज परीक्षित राजाला सांगतात,

कलेदपनिधे राजन् अस्ति होको महान् गुणः । कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तबन्धः परं व्रजेत् ॥ ५१ ॥

🚩 अभंग १५ | एक नाम हरि द्वैत नाम दुरी

एक नाम हरि द्वैत नाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥ १॥ 

समबुद्धि घेतां समान श्रीहरी । शमदमावरी हरि झाला ॥२॥ 

सर्वांघटीं राम देहादेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ||३|| 

ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ||४||


भावार्थ : 'हरि' हे नाम श्रीहरीशी ऐक्य साधणारे आहे, तर इतर शब्द द्वैतबोधक असल्याने श्रीहरीपासून दूर नेणारे आहेत. हे अद्वैताचे वर्म जाणणारे विरळच आहेत. समबुद्धीने सर्वत्र समरूपाने भरलेला श्रीहरी घेतला असता साधकाची शमदमादी साधनेही श्रीहरीच होतात. जसा एक सूर्यच हजारो किरणांनी सर्व जगाला प्रकाश देतो, तसा एक रामच सर्व देहांत राहून त्यांना ज्ञानमय करतो. श्रीज्ञानदेव म्हणतात, मी माझ्या चित्तात हरिपाठाचा नेम केला. त्यामुळे मी मागील जन्मांनाही मुकलो.


विवरण: एका हरिनामाशिवाय सृष्टीत जेवढे शब्द आहेत, ते द्वैताचा बोध करून देणारे असल्यामुळे अद्वैतरूप श्रीहरीपासून दूर आहेत आणि श्रीहरीही त्यांच्यापासून दूर आहे. त्यामुळे त्यांच्यापासून श्रीहरीची प्राप्ती होत नाही. ( dnyaneshwar mauli haripath) 

यावर कोणी अशी शंका घेईल की, “एक श्रीहरीच जर सर्वत्र व्यापून आहे, आणि सारे विश्व त्या श्रीहरिरूप अधिष्ठानावर मिथ्याच भासत असेल, तर विश्वातील सारे शब्द श्रीहरीचेच वाचक ठरतात. जसे, दोरीवर अंधारात जर सर्प भासला, तर सर्प हा शब्द आपण अधिष्ठानस्वरूप दोरीलाच वापरला. कारण सर्प नावाची दुसरी वस्तूच नाही. तसा सर्वत्र श्रीहरीच असल्याने प्रत्येक शब्द श्रीहरीलाच उद्देशून असणार. मग इतर शब्द श्रीहरीपासून दूर आहेत, असे कसे म्हणता येईल ?'

याचे उत्तर असे आहे : आपण म्हणता तसे सर्व शब्द श्रीहरीचेच वाचक होतील. पण केव्हा ? अमुक शब्दाचा अमुक अर्थ असे जे जीवाने मनाशी घट्ट धरले आहे, ते सोडून दिले तर ! 'समुद्र' शब्द उच्चारल्यानंतर डोळ्यांसमोर जलाशय न येता 'श्रीहरी' येत असेल तरच 'समुद्र' चा अर्थ श्रीहरी होईल आणि तो शब्द श्रीहरीचा वाचक होईल. याच अर्थाने 'यावन्ति वेदाक्षराणि तावन्ति हरिनामानि' असे म्हटले आहे. पण तसे होत नाही, हा प्रत्येकाचा अनुभव आहे. ( dnyaneshwar mauli haripath) 

शिवाय आपण दोरी-सर्पाचे उदाहरण घेतले आहे, तेही योग्य नाही. कारण 'सर्प' शब्दाचा उच्चार करतो, तो भासणाऱ्या सर्पाला उद्देशूनच असतो. अधिष्ठानरूप दोरीला नव्हे. तसेच जीव ज्या शब्दांचा उच्चार करतो, त्या त्या शब्दांनी त्यांचा अर्थ असणारे ते ते पदार्थच नजरेसमोर येतात. अधिष्ठानरूप श्रीहरी येत नाही. - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ

याउलट 'श्रीहरी' या उच्चाराबरोबर 'श्रीहरीच' डोळयांसमोर, मनासमोर येतो. तसेच स्वयं 'श्रीहरी' जसा सच्चिदानन्दस्वरूप आहे, तसे त्याचे नामही सच्चिदानन्दरूपच आहे. कारण नाम-नामींमध्ये अभेद असतो. या विषयी श्री एकनाथमहाराज म्हणतात-

"एका जनार्दनी नाम । शुद्ध चैतन्य निष्काम ।।"


🚩 अभंग १६ | हरिनाम जपे तो नर दुर्लभ

हरिनाम जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥ १ ॥ 

रामकृष्णनामीं उन्मनी साधिली । तयासी लाधली सकळ सिद्धी ॥२॥ 

सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंचीं निमाले साधुसंगें ॥ ३ ॥ 

ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा । तेणें दशदिशा आत्माराम ॥४॥


भावार्थ : 

वाणीने 'रामकृष्ण' नाम घेणे अत्यंत सोपे आहे. पण ते घेणारा माणूस मात्र दुर्मिळ आहे. 'रामकृष्ण' नामाच्या उच्चाराने अवस्था साध्य होते. त्यामुळे सर्व सिद्धी नामधारकाला प्राप्त होतात. सिद्धी, बुद्धी आणि धर्म हरिपाठानेच साध्य होतात. साधूच्या संगतीने भक्त प्रपंचात राहूनही मनाचा लय साधतात. श्रीज्ञानदेवमहाराज म्हणतात, माझ्या वाणीत रामकृष्ण नाम ठसल्यामुळे आणि हृदयात रूप ठसल्यामुळे मला दश दिशा आत्मारामस्वरूप झाल्या आहेत. उन्मनी - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ


विवरण: 

वाणीने भगवंतांचे नाम घेणे हे कितीसे कठीण आहे बरे! पण त्याची गोडी उत्पन्न होणे हीच कठीण गोष्ट आहे. बहुत सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ।' भगवन्नामाचे प्रेम उत्पन्न व्हायला अनेक जन्मांचे सुकृत पदरी असावे लागते. एखादा गायक अभंगांचे गायन करताना हरिनाम घेतो किंवा एखादा कीर्तनकार कीर्तनात नामाचा अनेकदा उच्चार करतो पण ते काही हरिनामाच्या प्रेमानेच असे म्हणता यावयाचे नाही. कोणी मैफल रंगवण्यासाठी तर कोणी बिदागीसाठी हरिनामाचा उपयोग करतो.  ( dnyaneshwar mauli haripath) 

जोरात ठेच लागली तर एखादा 'अरे देवा !' म्हणतो, ते काही भगवत्प्रेमाने नव्हे; तर वेदनातिशयाने अनाहूतपणे बाहेर पडलेला तो त्याचा उद्गार असतो. अशा स्वरूपाचे घेतलेले हरिनाम अनेक ठिकाणी आढळते. 

पण आवडीने, दृढ श्रद्धेने, सदा सर्वकाळ नामस्मरण करणारा भक्त विरळाच. कित्येकजण प्रेमाने नाम घेतातही; पण त्या जोडीने अन्य साधन केले पाहिजे, असेही त्यांना वाटते. हेही वाटता कामा नये. नामच सर्व काही आहे, अशी दृढ श्रद्धा असली पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात-

"नामाची आवडी तोचि जाणा देव । न धरी संदेह काही मनी । नाम म्हणे तया उरले साधन । ऐसे हे वचन बोलो नये ॥"

नामाच्या नितांत गोडीमुळे हरिनामाचा ज्याच्या वाणीला सारखा चाळा लागला, तो खरा नामधारक. त्याची स्थिती तुकाराम महाराज म्हणतात, 

“माझी मज झाली अनावर वाचा। छंद या नामाचा घेतलासे ।।” 


🚩 अभंग १७ | हरिपाठकीर्ति मुखीं जरी गाय

हरिपाठकीर्ति मुखीं जरी गाय | पवित्र तो होय देह त्याचा ॥१॥ 

तपाचें सामर्थ्य ते भिनलें अमूप। चिरंजीव कल्प कोटी नांदे ॥२॥ 

मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनि ठेले ||३|| 

ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीने दिधलें माझे हातीं ॥४॥


भावार्थ: जो कोणी मुखाने हरिपाठाची म्हणजेच हरिनामाची कीर्ती गाईल, त्याचा देह अत्यंत पवित्र होईल. नामस्मरणाच्या तपाचे प सामर्थ्य त्याच्या अंगी भिनले की कोट्यवधी कल्पांपर्यंत तो चिरंजीव होऊन नांदतो अर्थात् त्याचा कधीच नाश होत नाही. 

नामधारकाचे माता- पिता आणि सारे कुळ चतुर्भुज विष्णुरूप होऊन राहाते. गूढ रीतीनेच कळणारे हे ज्ञान माझ्या सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथांनीच माझ्या हाती दिले, असे श्रीज्ञानदेव महाराज म्हणतात. - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ


विवरण: हरिपाठकीर्ती म्हणजे हरिपाठाची कीर्ती किंवा हरिनामस्मरणाची कीर्ती म्हणजे महती जो कोणी गाईल, त्याचे शरीर पवित्र होते. श्रीनिवृत्तिनाथ महाराजांनी केलेल्या हरिनामाच्या उपदेशाची कीर्ती वर्णन करण्याकरता माउलींनी हरिपाठ हा ग्रंथ रचला. 


तो हरिपाठ नामोपदेश करणाऱ्या आपल्या गुरूंच्या उपदेशाची कीर्ती गाणारा झाल्यामुळे हरिपाठाचे पाठ करणे म्हणजे गुरूंच्या उपदेशाची कीर्ती गाण्यासारखेच आहे. आणि गुरूंच्या उपदेशाची कीर्ती जो गातो, त्यालाही नामस्मरण करणाऱ्यासारखेच फळ मिळते.


नामस्मरणाची कीर्ती गाणे म्हणजे नामस्मरणाचे माहात्म्य वर्णन करणे. हे माहात्म्य सांगतानाही आपोआप नामस्मरण घडतेच व त्या नामस्मरणाने त्यालाही अनंत पुण्य लाभते. ( dnyaneshwar mauli haripath)  'पुण्य' शब्दाचा व्यावहारिक अर्थ 'ज्यायोगे प्रापंचिक सुखांची प्राप्ती होते ते' असा सामान्यपणे केला जातो. पण माउली अशा पुण्याला पुण्यात्मक पाप म्हणतात. ज्यामुळे परमात्म्याची प्राप्ती होते, ते खरे शुद्ध पुण्य.


🚩 अभंग १८ | हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन

हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥ १ ॥ 

त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ||२|| 

मनोमार्गी गेला तो येथें मुकला। हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ।। ३।। 

ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णीं आवडी सर्वकाळ ॥४॥


भावार्थ : हरिवंशाचे वर्णन असलेल्या पुराणांचे श्रवण, हरिनामाचे कीर्तन आणि हरीशिवाय काहीही चांगले न वाटणे, या तीन गोष्टी ज्याने साधल्या, त्या माणसाला इहलोकीच वैकुंठाची प्राप्ती झाली, म्हणून समजावे. तसेच बसल्या जागी सर्व तीर्थयात्रा घडल्या. मात्र जो मनोमार्गाने गेला, तो मात्र परमार्थाला मुकला म्हणून ठाम समजावे. 

आणि जो हरिपाठात स्थिर झाला, अखंड हरिनामात रमला, तो धन्य झाला. श्री ज्ञानदेवमहाराज म्हणतात, मला हरिनामाची जोड लाभली आणि त्यात गोडी उत्पन्न झाली. आणि गोडीने, प्रेमाने नाम घेता घेता सर्वकाळ रामकृष्णरूपाचीच आवड वाटू लागली. - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ

विवरण: पुराणांत श्रीहरीची वंशावळी, श्रीहरीच्या लीला यांचे वर्णन आलेले असते. ते ऐकताना अथवा वाचताना सारे सात्त्विक भाव दाटून येतात. त्यामुळे आपोआप मुखाने हरिनामकीर्तन सुरू होते. ( dnyaneshwar mauli haripath) एकदा का या हरिनामाची गोडी लागली की इतर बोलणे नकोसे वाटू लागते. जिभेने अखंड रामकृष्णगोविंद, श्रीराम, यांसारख्या भगवन्नामाचा मोठ्याने किंवा मनातल्या मनात उच्चार चालू होतो. याविषयी संतश्रेष्ठ तुकाराममहाराज स्वानुभवाने सांगतात -


माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ।। नामधारकाची स्थिती अशीच होते. परिणामी


हरिउच्चारणी अनंत पापराशी । जातिल लयासी क्षणमात्रे ॥ पापराशींच्या क्षयाने मन शुद्ध होते, वासनारहित होते. अशा नामधारकाला श्रीहरीशिवाय दुसरे काहीही आवडेनासे होते. “विषयी विसर पडला निःशेष" अशी त्याची अवस्था होते. त्याला आपल्या भोवती असणारे मनुष्य, पशुपक्षी, वृक्षवल्ली सारी हरीचीच रूपे असल्याचा अनुभव येऊ लागतो. त्यामुळे तो जरी येथे व्यवहारात वागत असला, तरी त्याला येथेच वैकुंठाची प्राप्ती होते. - संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ हरिपाठ

कारण वैकुंठात सगुण साकार भगवंतांचे दर्शन, अखंड भगवन्नामस्मरण, संतांची संगती आणि भगवंतांच्या गुणांचे श्रवण या गोष्टी असतात. ( dnyaneshwar mauli haripath) नामधारक हे सर्व येथेच अनुभवतो, म्हणून त्याला येथेच वैकुंठाची प्राप्ती होते. स्वतः भगवान सांगतात,

परि तयांपाशी पांडवा । मी हारपला गिवसावा । जेथ नामघोष बरवा । करितीमाझा ॥

शिवाय संत सांगतात,

हरिकीर्तना लोभला देवो। विसरला वैकुंठा जावो ॥

आणि-

जेथे राहिला यदुनायक । तेथेंचि ये वैकुंठलोक । यापरी मुक्ती सलोक । कीर्तनें देख पावती भक्त ।।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad