Type Here to Get Search Results !

श्री ब्रह्मैतन्य गोंदवलेकर महाराज जीवन परिचय | चरित्र | संपूर्ण माहिती | Gondavlekar Maharaj

श्री ब्रह्मैतन्य गोंदवलेकर महाराज जीवन परिचय 

शके १७६६ माघ शुद्ध द्वादशी (१९ फेब्रुवारी १८४५ इ.) बुधवारी, सकाळी ९-३० च्या सुमारास गोंदवल्याला श्रीमहाराजांचा जन्म झाला, आणि शके १८३५ मार्गशीर्ष वद्य दशमीला (२२ डिसेंबर १९१३) सोमवारी पहाटे सूर्योदयाच्या सुमारास गोंदवल्यासच वयाच्या एकुणसत्तराव्या वर्षी त्यांनी देह ठेवला. 

श्री ब्रह्मैतन्य गोंदवलेकर महाराज जीवन परिचय | चरित्र | संपूर्ण माहिती | Gondavlekar Maharaj
गोंदवलेकर महाराज जीवन चरित्र 

श्री ब्रह्मैतन्य गोंदवलेकर महाराज जीवन चरित्र 


श्रीमहाराजांची उंची सुमारे १६७ सें.मी. आणि वजन जवळजवळ ७० कि... होते. मध्यम बांधा, पिवळसर झाक असलेला गोरा रंग, द चेहरेपट्टी, भव्य कपाळ, सरळ नाक, पांढरे शुभ्र दात, व चमकदार डोळे, अशी एकंदर त्यांची ठेवण होती. त्यांच्या तोंडावर एक प्रकारचे तेज तरळत असल्याने त्यांच्या साध्या मंद स्मिताने प्रत्येक माणसावर त्यांची सहज छाप पढे. 

श्रीमहाराज चोवीस तास लंगोटी घालीत, पण पुष्कळ वेळा कफनी, टोपी किंवा फरमूल पालीत. कमरेला कधी छाटी, धोतर, पीतांबर किंवा उपरणे गुंडाळीत आणि कधी डोक्याला रुमाल बांधीत. कपाळाला केशरी गंध लावून मध्ये काळी रेघ काढीत व मुद्रा लावीत. पायात नेहमी खडावा असत आणि हातात बहुतेक रुमाल असे. श्रीराममंदिरात रामासमोर एक कोच ठेवलेला असे (अजूनही तो तसाच ठेवलेला आहे) त्यावर ठेवलेल्या तक्क्याला टेकून ते बसत. आजोबा-आजी त्यांना " गणपति " म्हणून हाक मारीत, तर आई-वडील त्यांना "गणू म्हणून संबोधीत. गावचे लोक त्यांना "गणूबुवा" म्हणत. उत्तर भारतात लोक त्यांना "दखनके महाराज' असे म्हणत, श्रीमहाराजांचे गुरू श्रीतुकामाई त्यांना " माझा बाळ" म्हणून हाक मारीत. सर्व शिष्यमंडळी त्यांना "महाराज" म्हणत, तर ते स्वतः "ब्रह्मचैतन्यबुवा रामदासी" अशी आपली सही करीत.

गोंदवलेकर महारजांच्या सवयी व आवडीनिवडी - 


श्रीमहाराजांना प्रवासाची विलक्षण आवड होती. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षांपासून ते पंचेचाळिसाव्या वर्षांपर्यंत कल्पनातीत प्रवास केला. या प्रवासामध्ये त्यांना तत्कालीन समाजजीवन उत्तम रीतीने पाहाण्यास मिळाले. श्रीमहाराज पोहण्यात फार पटाईत होते. ज्याला मुळीच पोहता येत नाही अशा माणसाला बरोबर घेऊन ते गंगेमधून या तीरापासून पलीकडच्या तीरावर सहज जात. उताणे पडून पाण्यावर तरंगण्याची त्यांना फार हौस. घोड्यावर बसण्याची कला त्यांना अवगत होती. कसल्याही वात्रट व मुर्दाड घोड्याला ते नरम आणीत. जनावराला एकदा त्यांचा स्पर्श झाला की तो त्यांना वश होऊन त्यांच्यावर प्रेम करू लागे.

श्रीमहाराज पळण्यात व झाडावर चढण्यात फार पटाईत होते. सूर्यनमस्कार व दंड ते चांगले काढीत, खोखो, आट्यापाट्या, वगैरे खेळ ते हौसेने खेळत. वय होऊन पोट सुटले तरी त्यांचा चटपटीतपणा व चपळपणा कायम होता. वयाच्या ६२ व्या वर्षी काशीमध्ये पायात खडावा घालून शंभर-सव्वाशे दगडी पायऱ्यांचा घाट ते चटचट उतरून किंवा चढून जात. स्वच्छ व वळणदार अक्षराची त्यांना फार आवड. 

त्यांचे स्वतःचे अक्षर फार सुबक व वळणदार होते. मोठ्याने, स्पष्ट व अर्थ समजून वाचण्याची त्यांना आवड होती. लहान मुलांचे त्यांना फार प्रेम. ते त्यांच्यात खेळत व त्यांच्या मनाप्रमाणे वागत. विद्यार्थ्याने आपल्या अभ्यासात मागे पडता कामा नये, असे ते वारंवार सांगत. श्रीमहाराज आपल्या घरी यावेत असे ज्याला वाटे, त्याने आपल्या लहान मुलाला अगर मुलीला त्यांना घेऊन येण्यास पाठवावे, आणि श्रीमहाराजांनी आढेवेढे न घेता जावे, हे गोंदवल्यास नेहमी पहावयास सापडे.

कवितेची व गोड गळ्याच्या गायनाची त्यांना फार आवड. ते स्वतः कविता रचीत आणि लोकांनी केलेल्याकवितांचा मोठ्या रसिकतेने परामर्श घेत. तसेच ते बसल्या बसल्या मारुतिरायाचे सुंदर चित्र काढीत. 

त्यांना स्वाभाविक आवड भजनाची, देवांच्या गोष्टींची, नामस्मरणाची व एकांताची होती. त्यांना विद्वान् माणसापेक्षा अडाणी मनुष्य आवडे, श्रीमंतापेक्षा गरीब आवडे, व शहरात राहण्यापेक्षा खेडेगावात राहणे आवडे. नवराबायकोमध्ये, आई-बाप व मुलांच्यामध्ये, भाऊबहिणींमध्ये निष्कपट प्रेम असले तर त्यांना त्याचे विशेष कौतुक वाटायचे, सासू व सून प्रेमाने राहिल्या तर दोघींची ते फार स्तुति करीत. प्रपंचामध्ये निष्कपट प्रेम करायला शिकणे ही भगवंतावर प्रेम करावयास शिकण्याची पहिली पायरी आहे, असे ते नेहमी म्हणत.

श्री ब्रह्मैतन्य गोंदवलेकर महाराज जीवन परिचय | चरित्र | संपूर्ण माहिती | Gondavlekar Maharaj
गोंदवलेकर महाराज 


महाराजांचे व्यक्तिमत्त्व

श्रीमहाराजांचे सारे व्यक्तिमत्त्व त्यांच्या चमकदार डोळ्यांमध्ये आणि विलक्षण वाणीमध्ये व्यक्त होत असे. त्यांच्या पाहाण्यामधील आणि बोलण्यामधील विशिष्ट प्रकारच्या मोहिनीमुळे, त्यांच्याशी विरोध करणारी माणसे त्यांच्या दृष्टीच्या कक्षेत आल्यावर आणि त्यांचे भाषण ऐकल्यावर वश होऊन जात.
 
वारकऱ्यांशी, रामदास्यांशी, अडाणी शेतकऱ्यांशी, इंग्रजी शिकलेल्या तरुण-तरुणींशी. कलावंतांशी, शास्त्री पंडितांशी, सुधारकांशी, सनातन्यांशी, व्यापान्यांशी, नोकरीवाल्यांशी, डॉक्टरांशी, इंजिनिअरांशी, श्रीमहाराज त्यांच्या भाषेत बोलायचे, आणि त्या व्यवसायातील एखादी उपमा घेऊन नामाचे महत्त्व समजावून द्यावयाचे. त्यामुळे प्रत्येक मनुष्य त्यांचे म्हणणे समजून प्रसन्न होई. भक्तीचे, भगवंताच्या प्रेमाचे व नामाचे, तसेच संतांच्या वागणुकीचे स्पष्टीकरण करताना त्यांच्या वाणीला स्फुरण चढे आणि त्यावेळी ते उत्तम प्रकारचे दृष्टांत सहज बोलून जात.

मनुष्याला गोंजारून वळवून घेण्याची कला जशी त्यांना अवगत होती, तशीच वाह्यात माणसाला खडसावून ताळ्यावर आणण्याची कला पण त्यांच्यापाशी भरपूर होती. त्यांची भाषा घरगुती सोपी व सहजमधुर असे. त्यांची वाक्ये लहान पण जोरकस असायची आणि त्यात कृत्रिमतेचा लवलेशही नसल्याने ती वाक्ये ऐकणाऱ्यांच्या हृदयाला जाऊन भिडत. 

जीवनाचे अनंत नमुने त्यांनी बघितले असल्याने सामान्य मनुष्यांची सुखदुःखे, त्यांच्या खन्या वासना भावना, त्यांच्या अडचणी, याची संपूर्ण कल्पना त्यांना स्पष्टपणे आली होती. त्यामुळे श्रीमहाराज प्रापंचिक लोकांच्या अवस्थेचे वर्णन करू लागले म्हणजे ते इतके वास्तववादी असे की, त्यांची भाषा अंतःकरणाचा ठाव घेई व ऐकणाऱ्याचे त्यांच्यावर प्रेम बसे. त्यांची प्रतिभा अहोरात्र जागृत असायची, म्हणून त्यांची भाषा नेहमीपेक्षा निराळी वाटे. 

लोकांना भगवंताकडे वळविण्यासाठी श्रीमहाराजांनी आपल्या वाणीची सर्व शक्ति कामाला लावली. श्रीमहाराजांच्या वागण्यामध्येही विलक्षण खुबी असे. शिष्योत्तम ब्रह्मानंदांपासून थेट व्यसनी माणसापर्यंत त्यांची वागणूक समान असे. " माझ्यावर श्रीमहाराजांचे फार प्रेम आहे, " असे प्रत्येकाला वाटे. प्रत्येक माणसाचे

" अंतर " जाणून ते त्याच्याशी बोलत, म्हणून प्रत्येक माणसाला खूण पटून फार समाधान मिळत असे. समजूतदार मनुष्य श्रीमहाराजांना विशेष आवडे. एकच मनुष्य पूर्णत्वाला जाण्यापेक्षा, पुष्कळ माणसे थोडी पुढे जाणे चांगले असे त्यांचे म्हणणे असे. त्यांनी कधीही कोणाचा अव्हेर केला नाही. कसाही मनुष्य येवो, त्याला सुधारण्याचा मार्ग त्यांच्यापाशी असे. त्यांच्या वागण्यात बोलण्यात फार मर्यादा, आकर्षकता व गोडवा भरलेला असे. 

मुलांची, विशेषतः बुद्धिमान तरुणांची मने आकर्षित करून त्यांना आपलेपणाचा लळा लावण्याचे त्यांचे सामर्थ्य फार विलक्षण होते. ते स्वतः बहुधा लिहीत नसत, कोणास तरी लिहून घेण्यास सांगत. सांगण्याचा प्रवाह सारखा चाले. लिहिणे संपल्यावर पुन्हा वाचून घेत. त्यांना हिंदी, कानडी, तेलुगू, संस्कृत, वगैरे भाषा उत्तम समजत.

लहानसहान गोष्टींमध्ये श्रीमहाराज माणसाची परीक्षा करीत आणि तो कोठे आहे याची प्रचीति त्याला आणून देत गोंदवल्यास त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसावर श्रीमहाराज पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करीत. प्रापंचिक लोकांशी रात्रंदिवस व्यवहार करीत असताना श्रीमहाराज कधी कोणाचे मिंधे राहिले नाहीत, कधीही कोणापुढे हात पसरला नाही, कधी कोणाकडून वर्गणी गोळा केली नाही. 

त्यांनी आपला चरितार्थ अगदी स्वतंत्र ठेवला. पैशाचा मिंधेपणा नसल्याने श्रीमहाराजांना आपल्या मतांना लोकाग्रहास्तव मुरड घालण्याचा प्रसंग कधी आला नाही. लौकिकाचा, प्रसिद्धीचा, वर्तमानपत्री चर्चेचा, आणि व्यासपीठावरील व्याख्यानांचा त्यांना अगदी मनापासून कंटाळा असे. त्यांनी फार कटाक्षाने प्रसिद्धि टाळली. पूर्वकाळात श्रीमहाराज आपले नाव देखील नीट सांगत नसत. 

कोणाला सांगत, 'मी जंगम आहे, ' कोणाला सांगत 'मी नंगा बैरागी आहे, ' कोणाला सांगत 'मी कानफाटा योगी आहे, 'कोणाला सांगत 'मी पंढरीचा वारकरी आहे, 'तर कोणाला सांगत 'मी रामदासी आहे. ' या कारणाने, श्रीमहाराज गोंदवल्यास असतात हे बन्याच लोकांना माहीत नसे. श्रीमहाराज म्हणत की, "भगवंताच्या नामाला खरे महत्त्व आहे, सांगणारा कोणी का असेना. खरे कार्य इतके प्रचंड आहे, आपल्या जीवनाचा काल इतका घोडा आहे, आणि या जगात आपण इतके कःपदार्थ आहोत, की आपली प्रसिद्धि होऊ देणे अथवा ती करणे हा मूर्खपणा आहे.

ज्या माणसाला त्यांनी एकदा जवळ केला, त्याचे त्यांनी सर्व काही सोसले. म्हणून त्यांचा मनुष्य त्यांना असे त्यांचे नेहमी सांगणे सहसा सोडून गेला नाही. " मागच्या लोकांनी जे जे चांगले उपयुक्त कार्य करून ठेवले आहे, ते आपण का वाया घालवावे? चांगले जुने कायम ठेवून त्यामध्ये चांगल्या नव्याची भर घालावी, असे. 

जीवनाला उंची आणि व्यापकता आणून प्रत्येकाने शेवटपर्यंत हौसेने जीवन जगत राहिले पाहिजे, त्यामध्ये भगवंताच्या नामाला शेवटचा श्वास जाईपर्यंत सोडता कामा नये, असे ते म्हणत. एकंदर स्त्रियांच्याबद्दल त्यांच्या मनात फार आदर असून ते स्त्रियांना फार पूज्य मानीत. स्त्रियांनीच आतापर्यंत धर्म टिकवून ठेवला, स्त्रियांनीच समाजातील नीतिमत्ता टिकवून धरली, स्त्रियाच कुटुंबासाठी खऱ्या खस्ता खातात, स्त्रियाच पुरुषांपेक्षा जास्त निःस्वार्थी असतात, ज्या घराण्यातील खिया सुज्ञ असतात ती घराणी चांगली चालतात, असे ते नेहमी सांगत. 

आई व आईच्या प्रेमाविषयी बोलणे निघाले तर त्यांचा गळा भरून येई व डोळ्यांना पाणी येई. आई म्हणजे भगवंताच्या प्रेमाची प्रापंचिक मूर्ति होय, असे ते म्हणत. स्त्रियांचे अंतःकरण जात्याच शुद्ध व श्रद्धायुक्त असल्याने भगवंताचा मार्ग त्यांना सोपा आहे असे ते सांगत.

आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला श्रीमहाराज जेवायला घालीत. खरे सांगायचे म्हणजे भगवंताचे नाम ते जितक्या मुक्त हस्ताने वाटीत असत, तितक्याच मुक्त हस्ताने ते अन्नदान करीत. अन्नाने बुद्धि तयार होते, म्हणून प्रेमाने केलेला व प्रेमाने वाढलेला रामाचा प्रसाद (भाजी, भाकरी व आमटी) मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाने खाल्ला पाहिजे असे त्यांचे म्हणणे असे. 

मंदिरामध्ये अन्न सर्वांना अगदी एक असे. पंक्तिप्रपंचाची त्यांना फार चीड होती. पुष्कळ वेळा, मंडळींना जेवायला बसवून श्रीमहाराज आपण स्वतः वाढीत, आणि त्यांची जेवणे झाल्यावर मग आपण जेवायला बसत. पंढरपूरला जाणारे पुष्कळ वारकरी व त्यांच्या दिंड्या मंदिरामध्ये मुक्काम करीत, श्रीमहाराज त्या सर्वांचा मोठ्या प्रेमाने परामर्श घेत. पानावर बसल्यापासून जेवायला सुरुवात करीपर्यंत,

'जयजय श्रीराम, जयजय श्रीराम," असे मोठ्याने म्हणण्याचा प्रघात श्रीमहाराजांनी चालू केला. कोणतेही काम करताना, स्वयंपाक करताना, पाणी आणताना, पत्रावळी टोचताना, धान्य निवडताना, सारवीत असताना, झाडून काढताना, शेतात खपताना, विहीर खणताना, सर्व मंडळी भगवंताचे नाम घेऊ लागली. 

जिकडे तिकडे प्रत्येकजण आपले काम करीत असताना "जयजय श्रीराम " म्हणत असलेला वातावरण उत्पन्न झाले असे श्रीशांताश्रम स्वामींना वाटले. गोंदवल्यास रामरायाच्या अयोध्येचे आध्यात्मिक जीवन भगवंताच्या अस्तित्वाची जीवन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचाप्रत्येक क्षण कसा घालवावा, हे सामान्य स्त्रीपुरुषांस समजणे फार कठीण असल्यामुळे श्रीमहाराजांनी रामरायाला गोंदवल्यास आणून उभा केला. 

नुसता उभा केला असे नव्हे, तर स्वतः त्याच्यावर इतके प्रेम करून दाखविले की ते नैमिषारण्यात जाण्यास निघाले त्यावेळी रामाच्या डोळ्यात खरोखर अश्रू उभे राहिले. जो जो मनुष्य त्यांच्याकडे येई त्याला मोठ्या प्रेमाने ते सांगत, "अरे! माझ्या रामाला एकदा डोळे भरून पाहा आणि नंतर घरी जा. मंदिरात असलेला " श्रीराम " केवळ मूर्ति नसून प्रत्यक्ष परमात्माच आहे अशा भावनेने श्रीमहाराज स्वतः वागत, आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक स्त्रीपुरुषास तशा भावनेने वागण्याचा मनापासून उपदेश करीत. 

जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये श्रीरामरायाचीच इच्छा काम करीत असल्याचे त्यांना दिसे, व व्यवहारदृष्ट्या योग्य प्रयत्न केल्यावर जे चांगले-वाईट फळ मिळेल, ते रामाच्या इच्छेने मिळत असते अशी श्रद्धा ठेवण्यास सर्वांना सांगत. 

अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही, हे श्रीमहाराजांनी दाखवून दिले. सर्व काही राम करतो, खरे कर्तेपण रामाचे, हा श्रीमहाराजांच्या उपदेशाचा गाभा असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीत ते रामाला पुढे करून आपण नाहीसे होत. भगवंताकडे कर्तृत्व देऊन आपण मीपणाने नाहीसे होणे ही युक्ती सर्वांनी शिकावी म्हणून, यांनी जन्मभर श्रीरामालाच लोकांच्या समोर ठेवले. 

नवीन मनुष्य आला की श्रीमहाराज त्याला सांगत, "प्रथम रामाला नमस्कार करून यावे, नंतर इतरांना नमस्कार करावा. आपल्या जीवनातील प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी, आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे, असा त्यांचा फार आग्रह असे.

प्रत्येक माणसात भगवंताकडे जाण्यास उपयोगी पडणारा एक गुण असतोच असतो. त्या गुणाचा उपयोग व विकास करून भगवंताकडे कसे जावे, हे प्रत्येकाला शिकविण्याचे काम ते करीत असत. तत्त्व कितीही उच्च असले तरी त्याचा खरा व पूर्ण अर्थ तत्त्वाच्या आचरणामध्ये समजतो, अशी त्यांची ठाम भूमिका असल्याने, वेदान्ताची प्रमेये किंवा भगवंताची निष्ठा रोजच्या प्रापंचिक जीवनात उतरली पाहिजेत यावर त्यांचा फार कटाक्ष होता. परमार्थ हा प्रपंचात मिसळला पाहिजे असे ते नेहमी सांगत. 

ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही असे वरचेवर अनेक प्रकाराने ते पटवून देत. आपल्या संगतीला येणाऱ्या प्रत्येक माणसाला भगवंताच्या निष्ठेचे आणि नामाचे महत्त्व कळले पाहिजे, हा त्यांचा अट्टाहास होता; म्हणून जन्मभर परमार्थाचे अखंड चिंतन त्यांनी केले व लोकांकडून करवून घेण्याचा प्रयत्न केला. खऱ्या परमार्थाबद्दल लोकांमध्ये नाना तऱ्हेच्या गैरसमजुती, नाना प्रकारचे प्रमाद व विपरीत आचार दृढमूल झालेले असतात. 

ते सर्व दूर करण्याचा प्रचंड खटाटोप त्यांनी जन्मभर केला, आणि हे करताना समाजातील अनेक व्यक्तींकडून अनेक प्रकारचा त्रास त्यांना सोसावा लागला. आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही माणसाचा अव्हेर करायचा नाही, हे श्रीमहाराजांच्या जीवनाचे प्रधान तत्त्व होते. निंदक जरी त्यांच्याकडे आला तरी ते त्याच्याशी प्रेमाने वागत. तीच रीत व्यसनी माणसाशी वागताना ते पाळीत. याचा परिणाम असा होई की, तो मनुष्य आपोआप त्यांना वश होऊन जाई, आणि एकदा तो वश झाला की त्याला भगवंताच्या मार्गावर नेऊन सोडण्याची त्यांची करामत पाहावयास मिळे.

'नुसती प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नाही. जनावरे देखील आपला प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ति करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातील कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीत उपासना करण्यास नामासारखा सोपा उपाय नाही, म्हणून प्रत्येकाने नामाचीच कास धरावी, हेच त्यांच्या शिकवणीचे सूत्र होते. हे तत्त्व स्वतः पूर्णतः आचरणात आणून मगच त्यांनी लोकांना सांगितले. इ.स. १९१३ साली गोंदवल्यास झालेला रामनवमीचा उत्सव म्हणजे श्रीमहाराजांच्या आयुष्यातील शेवटचामोठा उत्सव होय. 

नऊ दिवस अहोरात्र अखंड नामस्मरण चालू होते. शिवाय रोज कीर्तन, पुराण, प्रवचन, अध्यात्मसंवाद इत्यादि गोष्टी सुरू होत्याच. जवळजवळ पाच हजारांवर माणसे गोंदवल्यास जमली होती. नमस्कार करायला येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या पाठीवरून हात फिरवून श्रीमहाराज त्याला सांगत, “बाळ, भगवंताने प्रपंचामध्ये ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवले आहे, तिच्यामध्ये समाधान मानावे, आणि त्याच्या नामाला कधी विसरू नये. जो नाम घेईल त्याच्यामागे राम उभा आहे, नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो. एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका. "

भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले, जन्मभर नामाचे त्यांनी गायन केले, आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षणही नामाचे महत्त्व सांगण्यात त्यांनी घालविले. श्रीमहाराजांनी जन्मभर काया-वाचा-मनाने जगात एका नामाशिवाय दुसरे काही सत्य मानलेच नाही.

जयाचा जनीं जन्म नामार्थ झाला । जयानें सदा वास नामांत केला ॥ जयाच्या मुखीं सर्वदा नामकीर्ति नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य ।। मूर्ति

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad